अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, मी सृष्टीची निर्मिती केल्यानंतर प्रपंचाची निर्मिती झाली म्हणजेच सृष्टीपूर्वी प्रपंच नव्हता. तसेच प्रलयानंतर काहीच उरत नसल्याने प्रपंचाचाही प्रलयात नाश होतो. थोडक्यात अव्यक्तातून काही काळ प्रपंचाचा भास होतो आणि कालांतराने तो नाहीसा होतो म्हणजे अव्यक्तात परत जातो. प्रपंचाचे अवडंबर मोठे असते. गीतेत त्याला खाली व वर मुळे असलेल्या अश्वथ वृक्षाची उपमा दिलेली आहे. प्रपंचामध्ये व्यक्ती, वस्तू नामरूप धारण करून वावरतात आणि कालांतराने नष्ट होतात. तेव्हा प्रपंचाचं अस्तित्व नाममात्रच असतं पण त्याला प्रकाशित करणारा परमात्मा स्वतंत्र असतो. ही गोष्ट अज्ञानी जाणत नसल्याने त्याला भवसागर तरुन जाणे दुस्तर वाटते. ज्याच्यापासून प्रपंच निर्माण झाला, ज्याने त्यात जिवंतपणा आणला आणि शेवटी त्याच्यातच निमाला त्या निजात्म्याला तो जाणत नाही. प्रपंच हा ब्रह्मापेक्षा वेगळा असल्याने भगवंत त्याला जवळ करत नाहीत हे ज्याच्या लक्षात येतं तो ब्रह्मच होतो. उद्धवाच्या मनात अशी शंका आली की, हे इतकं सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ असताना सर्वजण प्रपंचाच्या इतके आहारी का जात असतील. या माझ्या शंकेचा खुलासा भगवंतानी केला तर किती बरं होईल. उद्धवच्या मनातले विचार भगवंतांनी लगेचच जाणले आणि ते म्हणाले, मनुष्य प्रपंचाच्या आहारी जाण्यासाठी त्याचे मन मुख्यत्वाने कारणीभूत असते. इच्छा, द्वेष, सुख दु:ख असे अनेक विकार मनाला जडलेले असतात. मन शरीर आणि आत्मा ह्यातील असंतुलनातून मनाचे विकार म्हणजे मनाचे आजार निर्माण होतात. आधीच विकारी असलेल्या मनाला त्रिगुणांची जोड मिळाली की, मुळातून अस्तित्वात नसलेला संसार माणसाला चित्रविचित्र दृश्ये दाखवू लागतो आणि ती सगळी दृश्ये मनुष्याला खरी वाटू लागतात. सत्व, रज, तम गुणाचे विकार वेगवेगळे असतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अधिष्ठाते सुरवर ह्यापासून सत्त्वगुणाचे विकार होतात. रजोगुणाचे विकार दशेंद्रिये, पंचभूते ह्यापासून होत असतात. प्रपंचाचे माजवलेले अवडंबर लोकांना फार भुलवत असते. त्या अवडंबरामुळे प्रपंच फार प्रबळ भासतो. ह्यातून तमोगुणाचे विकार निर्माण होतात. त्रिगुणांच्या विकारामुळे मिथ्या आणि निर्मुल असलेल्या प्रपंचाचे प्रबळ भास होत असतात. सत्वगुणाच्या विकारांमुळे माणसाला मीच काय तो सुखी आणि ज्ञानी असे वाटत असते. तर रजोगुणी विकार माणसाला कशाचे समाधान म्हणून मिळून देत नाहीत. तमोगुणाचे विकार माणसाला आळशी बनवतात आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावतात. ब्रह्म हे स्वयंप्रकाशित आहे. स्वत:च्या प्रकाशाने प्रकाशमान असलेले ब्रह्म कोणतेही कारण नसताना महाकारण होऊन प्रपंचाला प्रकाशमान करते. त्यातूनच छायाप्रकाशाच्या खेळाप्रमाणे नाना व्यक्ती, वस्तू दिसू लागतात. जगाचा आकार निर्माण होतो. माझ्याही सगुण रूपाचा भास होऊ लागतो. थोडक्यात प्रपंचाचे ब्रह्माला होणारे स्फुरण ब्रह्माच्या स्वत:च्या सत्वयुक्त प्रकाशाने होत असते. तळहातावर ठेवलेला आवळा ज्याप्रमाणे स्पष्टपणे निरखता येतो त्याप्रमाणे पूर्वी मी तुला नाना युक्तीने, सविस्तरपणे ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितले आहेच. वेदात काय सांगितलं आहे, विवेक कशाला म्हणतात, ब्रह्मऊपदेशाचे लक्षण कोणते, ज्ञान कोणते, अज्ञान कशाला म्हणतात ते मी तुला सविस्तर सांगितले आहेच. तसेच देह, इंद्रिये हे समोर दिसत असूनसुद्धा निरर्थक म्हणजे मिथ्या कशी आहेत, देहभाव आणि आत्मभाव ह्यात काय फरक आहे, केवळ ब्रह्म सत्य असून समोर दिसणारे विश्व मिथ्या कसे आहे हे सर्व गुह्य ज्ञान तुला दिले. मी तुला दिलेले ज्ञान परिपूर्ण असून इतरांना ते सहजी मिळण्यासारखे नाही. चुकून कुणाला मिळालेच तरी समजण्यासारखे नाही.
क्रमश:








