अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, त्रिगुणांचे त्रिविध मळ हे समूळ मिथ्या मायिक असल्याने त्यांचा निर्मळ अशा ईश्वराचा अंश असलेल्या आत्म्यावर थोडासासुद्धा परिणाम होत नाही. मुळातच ईश्वर कसा आहे ते सांगता येत नाही. त्याला अमुक तमुक, असा तसा याप्रमाणे कोणतंही प्रमाण नाही. कारण तो ह्या प्रमाणांपेक्षा वेगळाच आहे. त्यामुळे तो सदोदित स्वानंदात मग्न असतो. ईश्वराच्या ठिकाणी वृद्धी आणि ऱ्हास, आदि, मध्य, अंत ह्यांना प्रवेशही नसतो. या रीतीने धर्म आणि अधर्म, सकळ भूतांचे क्रियाकर्म ह्यापासून परमात्मा अलिप्त असतो. परमात्मा ज्ञान अज्ञानापासूनही अलिप्त असतो. जेथे ज्ञानअज्ञानाचा अभाव असतो तेथे कर्माकर्म कुठून येणार? परमात्मा हा कोणताही भेद न मानता स्वानंदात रममाण असतो. असा परमानंदात असलेला परमात्मा सजातीय, विजातीय आणि स्वगत ह्या तिन्हीप्रकारच्या भेदांपासून मुक्त असतो. त्यामुळे तो शुद्ध असतो. भगवंतांचे हे बोलणे ऐकल्यावर उद्धवाचा चेहरा प्रश्नार्थक झाला. भगवंतांनी ओळखले की, आत्ता आपण सांगितलेले भेद ह्याच्या लक्षात आलेले नाहीत. म्हणून ते म्हणाले, उद्धवा ‘विजातीय भेद’ म्हणजे मी देह आहे असे म्हणणे, ‘सजातीय भेद’ म्हणजे मी आत्मा आहे असे समजणे आणि ‘स्वगत भेद’ म्हणजे मी ब्रह्म आहे असे मनात येणे परंतु परमात्म्याला हे तिन्ही भेद माहीत नसतात. त्यामुळे तो स्वत:ला शरीर किंवा जीव मानत नाही तसेच मी ब्रह्म आहे असेही त्याला वाटत नाही. ब्रह्म परिपूर्ण असून एकाकी असते हेच निजगुह्याचे उत्तम गुह्य आहे. हे ज्याच्या लक्षात आलंय तो परम सौभाग्याचा होय कारण त्याला भवभ्रम कधी बाधत नाही. म्हणजे समोर दिसणारे जग खरे आहे असे त्याला कधी वाटत नाही. साहजिकच त्याच्या मनात जगातील वस्तू, व्यक्ती व परिस्थिती ह्याबद्दल राग लोभाची भावना निर्माण होत नाही. त्यामुळे त्याच्या हातून पाप पुण्य निर्माण करणारी कर्मे होत नाहीत. तो जी काही कर्मे करत असतो ती मीच त्याच्याकडून करून घेत आहे ह्याची जाणीव त्याला असते. त्यामुळे मी कर्ता आहे असे कधी त्याच्या मनातसुद्धा येत नाही. तो जी काही कर्मे करतो ती माझीच आहेत, हे लक्षात घेऊन ती जशी त्याच्या हातून पूर्ण अपूर्ण अवस्थेत पार पडतील ती जशीच्या तशी त्याच्या फळासकट तो मला अर्पण करतो आणि स्वत: संसार बंधनातून मुक्त होतो. तो देहात असताना त्याला त्रिगुणांची बाधा होत नाही तसेच जन्ममरणही त्याला बाधत नाही. ब्रह्म परिपूर्ण असून एकाकी असते हेच निजगुह्य ज्याच्या लक्षात आलंय त्याचं स्वरूप स्पष्ट सांग असं जर उद्धवा तू मला म्हणशील तर मात्र तोंडाने ते सांगणे सर्वस्वी अशक्य आहे रे बाबा! कारण जिथं श्रुती त्याचं वर्णन करताना थकल्या, जिथे अतिविवेकसंपन्न अशा बुद्धिला प्रवेश मिळत नाही, ती वस्तू वाचेच्या आधीन नसतेच. जिथं शास्त्रांची व्युत्पत्ती खुंटते, श्रुति जिथं ‘नेति नेति’ म्हणून माघारी फिरतात तिथं वचनांना विचारतो कोण? शब्दांना वाटलं की, आपल्याला परमगुह्य जाणणाऱ्या व्यक्तीबद्दल जे समजलं आहे ते भाषेचा मोठा डौल घालून इतरांना सांगावे म्हणून शब्द सरसावून पुढे येतात पण काही सांगावं असं त्यांनी ठरवलं तर एकही गोष्ट त्यांना समजावून सांगता येत नाही. म्हणून सर्व समजावून सांगा असं म्हणशील तर परा वाचेशिवाय हे सांगणे शक्य नाही म्हणून परमगुह्य जाणणाऱ्या व्यक्ती ‘परात्पर’ किंवा क्षराक्षराच्या पलीकडे असते असे समज! अरे, असा मनुष्य संपूर्णपणे म्हणजे मन आणि बुद्धीसह मला समर्पित असतो. त्यामुळे त्याचे सर्व अवयव शून्यवत असतात पण शून्य हा एक आकडा म्हणून सांगायचं एव्हढंच कारण त्या आकडा सांगण्यालाही काही अर्थ नाही. शून्याला म्हणून जे काही अस्तित्व असेल तेव्हढेही त्याचे अस्तित्व नसते. तो अगदी एकाकी आणि परिपूर्ण असतो. अशा व्यक्तीचे वर्णन करावे म्हणून शब्दांनी बऱ्याच कसरती केल्या, अनेक युक्त्या केल्या परंतु त्या सगळ्या व्यर्थ जाऊन ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर त्याच्या तेजापुढे पक्षांचा ठावठिकाणा रहात नाही.
क्रमश:








