अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, ब्रह्म परिपूर्ण असून एकाकी असते हे निजगुह्य ज्याच्या लक्षात आलंय अशा साधकाचं स्वरूप स्पष्ट सांग असं जर उद्धवा तू मला म्हणशील तर मात्र तोंडाने ते सांगणे सर्वस्वी अशक्य आहे रे बाबा! कारण जिथं श्रुती त्याचं वर्णन करताना थकल्या, जिथे अतिविवेकसंपन्न अशा बुद्धीला प्रवेश मिळत नाही, ती वस्तू वाचेच्या आधीन नसतेच. जिथं शास्त्रांची तर्कसंगती खुंटते, श्रुती जिथं ‘नेति नेति’ म्हणून माघारी फिरतात तिथं वचनांना विचारतो कोण? शब्दांना वाटलं की, आपल्याला परमगुह्य जाणणाऱ्या व्यक्तीबद्दल जे समजलं आहे ते भाषेचा मोठा डौल घालून इतरांना सांगावे म्हणून शब्द सरसावून पुढे आले आणि काही सांगावं असं त्यांनी ठरवलं तर एकही गोष्ट त्यांना समजावून सांगता येत नाही. अरे, असा मनुष्य संपूर्णपणे म्हणजे मन आणि बुद्धीसह मला समर्पित असतो. त्यामुळे त्याचे सर्व अवयव शून्यवत असतात. तो अगदी एकाकी आणि परिपूर्ण असतो. गंमत बघ, जी मंडळी रात्री दिवे लाऊन त्यांची कामे उरकतात तेच दिवस उजाडला की, दिव्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना बाजूला ठेवतात. त्याप्रमाणे पंडीत शब्दांचा उपयोग करून ज्ञान मिळवतात, ब्रह्म म्हणजे काय ते समजून घेतात पण जेव्हा त्यांना ब्रह्मप्राप्ती होते तेव्हा तो अनुभव शब्दात मांडता येत नसल्याने शब्दांची उपेक्षा करून त्यांना बाजूला सारून ब्रह्माच्या अनुभूतीबद्दल मौन बाळगणे पसंत करतात. काही विद्वान नुसतेच शब्द्पंडीत असतात. ब्रह्म समजून घेण्यापेक्षा, त्याची अनुभूती घेण्यापेक्षा त्यांना त्यांच्या शब्द पांडीत्याचाच अभिमान असतो. अशा विद्वानांपासून ब्रह्मज्ञान दूरच राहते कारण अभिमान असणे हे देहबुद्धी शाबूत असण्याचेच लक्षण असते. त्यामुळे मला सर्व कळते, माझ्यासारखा हुशार मीच आहे, मी अत्यंत सुखी आहे असा अहंकार त्याच्यात असतो. मग मला मन आणि बुद्धी अर्पण करण्याची इच्छा त्यांना कशी होणार? मग तशी कृती करणे तर दूरच राहते. ह्याबद्दल एक मजेशीर उदाहरण सांगतो. आई, बाप, बंधू, नातेवाईक, ज्योतिषी असे एकत्र जमून घरातल्या उपवर मुलीचे लग्न जमवतात. धुमधडाक्यात ते पार पाडतात. वराला मुलगी अर्पण करतात. इथपर्यंत सगळ्यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम आनंदात पार पडत असतात पण नंतर नवऱ्याबरोबरच्या एकांत समयी हे सर्व अत्यंत जवळचे नातेवाईक उपस्थित राहिले तर त्या मुलीवर काय अनावस्था प्रसंग ओढवेल ह्याचा विचार कर. त्याप्रमाणे पंडितांच्या ठिकाणी योग्यता, चातुर्य हे शब्दज्ञानाच्या माहितीमुळे पुरेपूर असते आणि त्याचा त्यांना लोकात मान मिळवण्यासाठी मोठाच आधार वाटत असतो. परंतु उद्धवा ब्रह्मज्ञान जाणून घेण्यासाठी हेच शब्दज्ञान काडीच्या उपयोगाचे नसते. उलट अहंकाराला कारणीभूत होणारे शब्दज्ञान असणे हीच ब्रह्म जाणून घेण्यातली मोठी अडचण ठरते. शब्दज्ञान केवळ ब्रह्माची कल्पना करू शकते पण ज्याप्रमाणे डोळ्यात केसभरही कचरा गेला तर चैन पडत नाही त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना आली की, ते दूर पळाले म्हणून समज. त्यामुळे येथे कल्पनेला यत्किंचीतही थारा नसतो. ब्रह्म ही कल्पना करण्याची गोष्टच नव्हे. तर स्वत: तपस्या करून अनुभवण्याची बाब आहे. सगळ्या ज्ञानाचा शेवट, सगळ्या वचनांचा विराम ब्रह्मात होतो एव्हढी एक गोष्ट लक्षात ठेवलीस तरी पुरे. ब्रह्माचा ठावठिकाणा बुद्धीला लागत नाही, मन तर त्याची कल्पनाच करू शकत नाही कारण मनाला कोणत्याही गोष्टीची कल्पना येण्यासाठी प्रमाणाची गरज असते. अमुक अमुक, तमुक तमुक सारखे आहे असे मनात ठसले तर मन त्याची कल्पना करू शकते परंतु ब्रह्माची तुलना कशाशीच होत नसल्याने ब्रह्म ही संकल्पना मनाच्या कक्षेच्या बाहेरची असते. आता कदाचित तुझ्या मनात असे येईल की, जे बुद्धीला समजण्याच्या पलीकडे आहे, मन ज्याची कल्पना करू शकत नाही, जे शब्दज्ञानाच्या पलीकडचे आहे असे जर ब्रह्माचे वर्णन असेल तर मुळातच ब्रह्म नावाची वस्तू अस्तित्वात तरी असेल का?
क्रमश:








