पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प : मंदिरासाठी एकवटले गावकरी
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील मच्छे गावात सध्या जागृत देवस्थान ब्रह्मलिंग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडात करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. याचे कामकाजही सध्या जोमाने सुरू आहे. अशा पद्धतीच्या बांधकामाचे या भागातील हे एकमेव मंदिर ठरणार आहे यामुळे या मंदिराच्या जीर्णोद्धाराची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तालुक्यात सर्वाधिक सदस्य असलेली पहिली ग्रामपंचायत म्हणजे मच्छे व दुसरी पिरनवाडी आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना सध्या नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर नागरिकांना अनेक मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. याबद्दल वारंवार तक्रारी होत आहेत. मच्छे गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिवारात निसर्गरम्य अशा परिसरात ब्रह्मलिंगाचे देवस्थान देवस्थान आहे.
काही महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले व सर्वानुमते या मंदिराचे बांधकाम केवळ आणि केवळ दगडातच करण्याचे ठरविले. त्यामुळे या मंदिरासाठी नागरिकांचा निश्चय इतिहासासाठी पात्र ठरणारा आहे. प्रारंभी काळ्या कौलारू असे मंदिर होते. गेल्या 56 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्यानंतर आत्ता मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अभिषेक व विविध पूजा असे कार्यक्रम होतात व चौथ्या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. याचबरोबर डिसेंबर महिन्यात या मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते. दोन दिवस यात्रा होते. यात्रेत इंगळ्यांचा कार्यक्रम होतो. दर सोमवारी सध्या प्रत्येक गल्लीतर्फे मंदिराजवळ महाआरती करण्यात येत आहे. यावेळी महिलांची व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.
एकजुटीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सहकार्य करा
या मंदिराचे बांधकाम दगडात करण्यात येत आहे यासाठी जीर्णोद्धार कमिटीचे चांगाप्पा हावळ, सुरेश लाड, संजय सुळगेकर, शंकर बेळगावकर, नागेश गुंडोळकर, पिंटू नावगेकर, बसवंत नावगेकर व देवस्थान कमिटीचे इतर सदस्य मंदिरासाठी परिश्रम घेत आहेत. सर्वांनी एकजुटीने मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासाठी सहकार्य करावे असेही देवस्थान पंच कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.









