सोळाशेहून अधिक जणांकडून 1.39 कोटी रुपयांचा दंड वसूल
बेळगाव : गरीब कुटुंबांना देण्यात येणारे बीपीएल कार्ड मिळविलेल्या 1600 हून अधिक सरकारी नोकरदारांना आहार व नागरी पुरवठा खात्याने दणका दिला आहे. अपात्र रेशनकार्डधारकांवर 1.39 कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने गैरमार्गे रेशनकार्ड मिळविलेल्या सरकारी बाबूंचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात सध्या 67,667 अंत्योदय, 10,72,692 बीपीएल व 3,30,455 एपीएल रेशनकार्ड सुरू आहेत. एकूण 50,79,707 रेशनकार्डधारक आहेत.
बीपीएल कार्ड मिळवणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचा शोध आहार व नागरी पुरवठा खात्याने सुरूच ठेवला आहे. 2022 मध्ये 1,316 सरकारी नोकरदारांची बीपीएल कार्डे रद्द केली आहेत. त्यांच्याकडून 1.22 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. 2024-25 मध्ये पुन्हा शोधमोहीम हाती घेऊन बीपीएल कार्ड मिळविलेल्या 363 सरकारी कर्मचाऱ्यांची कार्डे रद्द करून 17.10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एचआरएमएसमध्ये संग्रहित झालेल्या माहितीच्या आधारावर जिल्ह्यातील एकूण 1,679 सरकारी नोकरदारांना नोटीस जारी करून त्यांच्याकडून 1 कोटी 39 लाख 27 हजार 221 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
स्वत:हून बीपीएल कार्डे जमा
त्याचप्रमाणे 2025-26 मध्ये अपात्र 1 हजार 407 रेशनकार्डधारकांवर कारवाई करून 7 लाख 55 हजार 177 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 932 रेशनकार्डधारकांनी स्वत:हून बीपीएल कार्डे आहार व नागरी पुरवठा खात्याकडे जमा केली आहेत. आयकर भरणाऱ्या 591 जणांची बीपीएल कार्डे रद्द करण्यात आली आहेत. एकूण जिल्ह्यात एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 48,153 अपात्र रेशनकार्डधारकांची बीपीएल रेशनकार्डे रद्द करून 1.75 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ज्या सरकारी नोकरदारांनी एपीएल ऐवजी बीपीएल कार्डे घेतली होती, अशा 1679 जणांची बीपीएल कार्डे एपीएलमध्ये बदलण्यात आली आहेत. 3 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेली 7544 कुटुंबे आणि स्वत:हून रेशनकार्ड जमा केलेल्यांचीही एपीएलमध्ये कार्ड रूपांतर करण्यात आली आहेत. एकूण जिल्ह्यात 10,746 बीपीएल कार्डांचे एपीएलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात 18,938 मयत व्यक्तींची नावे रेशनकार्डातून कमी करण्यात आली आहेत.









