प्रतिनिधी/ बेळगाव
नेहरुनगर येथील पीजीमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यासंबंधी विजापूर येथील दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून एपीएमसी पोलिसांनी त्या विद्यार्थिनीच्या मित्राला अटक केली आहे. आकाश नागेश चडचण, रा. कसगेरी गल्ली, विजापूर व त्याचा मित्र महेश शिवाप्पा नागराळ, रा. जेलनगर, हुडको बसस्टॉपजवळ, विजापूर या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला त्यांनी दिलेला मानसिक त्रासच कारणीभूत असल्याची फिर्याद त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी दाखल केली आहे.
पोलिसांनी आकाश चडचणला अटक केली आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. आकाशचा मित्र महेशचाही शोध घेण्यात येत आहे.
मंगळवार दि. 25 मार्च रोजी सायंकाळी 6 ते रात्री 8 यावेळेत पहिला क्रॉस, नेहरुनगर येथील एका पीजीमध्ये ऐश्वर्यलक्ष्मी मेलप्पा गलगली (वय 24) रा. इब्राहिमपूर, विजापूर या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या खोलीला आतून कडी लावली होती. दरवाजा तोडून तिचा मोबाईल पळविण्यात आला होता. त्यामुळेच संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली होती.









