कोल्हापूर :
लिव्ह इनमध्ये राहणारी प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय 23, रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा चाकूने भोसकून खून करून पसार झालेला सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री, ता. पन्हाळा) यांने मोबाईल बंद करुन ठेवला आहे. बुधवारी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकूनही तो सापडला नाही.
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसी समीक्षा हिचा सतीश यादव याने मंगळवारी (दि. 3) दुपारी सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात भोसकून खून केला. या खूनानंतर सतीश पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत आहेत. तो काम करीत असलेल्या ठिकाणी शिवाजी पेठेतील एका क्लबमध्ये आणि गावाकडे छापा टाकून पथकांनी शोध घेतला. मात्र, सतीश सापडला नाही. त्याचा मोबाइल बंद असल्याने नेमका ठावठिकाणा लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी समीक्षाची मैत्रीण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आयशू अंपले, समीक्षाची आई आणि बहिणीचा जबाब नोंदवला. तसेच मृत समीक्षाचे रक्ताने माखलेले कपडे, गुह्यातील चाकू जप्त केला. लवकरच आरोपीस पकडण्यात यश येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी व्यक्त केला.
- समीक्षाचे कुटुंब भेदरलेलेच
समीक्षाच्या खूनामुळे सानिकाची आई,दोन भावंडे अद्यापही भेदरलेल्या अवस्थेत आहेत. तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे.नातेवाईक आणि गल्लीतील नागरिक त्यांना धीर देत आहेत.








