आम आदमी पार्टीचे ओबीसींना आवाहन
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करण्यात भाजप सरकार पूर्ण अपयशी ठरले असून याचा निषेध म्हणून या सरकारचे घटक असलेल्या ओबीसी मंत्र्यांनी राजीनामा देऊन स्वाभिमान दाखवावा, त्याचबरोबर सर्व ओबीसींनी येत्या पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऍड. अमित पालेकर यांनी केले आहे.
बुधवारी पक्षाच्या पणजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी उपेंद्र गावकर, नोनू नाईक आणि मुख्य प्रवक्ते राजदीप नाईक आदींची उपस्थिती होती.
वर्ष 2013 पासून ओबीसींची जनगणना पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ओबीसी आरक्षण संबंधित डेटा संकलन करण्यासाठी पुरेसा वेळ असतानाही राज्य सरकार ते देण्यास अपयशी ठरले. परिणामी गोव्यातील 50 टक्क्मयांहून अधिक लोकसंख्येकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता पंचायत निवडणूक घेण्यासाठी सरकार आणखी वेळ मागत आहे, असे पालेकर म्हणाले.
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात राज्य सरकारने पंचायत निवडणूक चौथ्यांदा पुढे ढकलल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यातून ओबीसींच्या हक्कासाठी काहीच न केल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणुनच सरकार आता पंचायत निवडणुकीच्या आदेशाला घाबरले आहे यात शंका नाही. त्यामुळेच ते निवडणूक पुढे ढकलण्यासाठी विविध कारणे शोधत आहेत, असा दावा पालेकर यांनी केला. अशावेळी सरकारच्या या स्वार्थी हेतूंविरुद्ध लढण्यासाठी आपण सर्व एक होणे गरजेचे आहे, असे ते पुढे म्हणाले.









