हॉटेल अन् रेस्टॉरंट्सनी घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुराच्या हॉटेल आणि रेस्टॉरंट संचालकांनी बांगलादेश नागरिकांना स्वत:च्या येथे अन्नपदार्थ आणि खोली न देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट एसोसिएशनने बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित आपत्कालीन बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. यापूर्वीही अशा घटना घडत होत्या, परंतु आता तेथे मर्यादा ओलांडली गेली आहे. आम्ही बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करत आहोत असे असोसिएशनचे महासचिव सैकत बंदोपाध्याय यांनी म्हटले आहे.
रुग्णालयांकडून यापूर्वीच नकार
त्रिपुरा आणि कोलकात्यातील रुग्णालयांनी बांगलादेशी नागरिकांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. सिलीगुडी येथे डॉक्टर शेखर बंदोपाध्याय यांनी क्लिनिकमध्ये तिरंगा फडकविला आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा आमच्या मातेसमान आहे. कृपया चेम्बरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिरंग्याला सलाम करा, खासकरून बांगलादेशी नागरिकांनी याला सलाम केला नाही तर आत प्रवेश दिला जाणार नाही असा फलक त्यांनी लावला आहे.
4 पोलिसांवर कारवाई
त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे सोमवारी बांगलादेशी उच्चायोगानजीक इस्कॉनचे पदाधिकारी चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या लोकांनी विरोधात रॅली काढली होती यादरम्यान 50 हून अधिक निदर्शक हे उच्चायोग परिसरात शिरले होते. या घटनेप्रकरणी मंगळवारी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तर निदर्शने करणाऱ्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. त्रिपुरातील घटनेची भारतीय विदेश मंत्रालयाने निंदा केली होती. विदेश मंत्रालयाने दिल्ली येथील बांगलादेशी दूतावास तसेच देशभरातील अन्य सहाय्यक उच्चायोगांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.









