दुलीप ट्रॉफी उपांत्य लढत : उत्तरेची दक्षिणेवर 54 धावांची आघाडी
वृत्तसंस्था /बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरुवारी खेळाचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. दिवसभरात एकूण 18 गडी बाद झाले. या सामन्यात उत्तर विभागाने दक्षिण विभागावर दिवसअखेर 54 धावांची आघाडी मिळवली आहे. या सामन्यात दक्षिण विभागाने नाणेफेक जिंकून उत्तर विभागाला प्रथम फलंदाजी दिली होती. खेळाच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने दक्षिण विभागाने पहिल्या डावात 4 बाद 63 धावा जमवल्या होत्या. या धावसंख्येवरून उत्तर विभागाने खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 58.3 षटकात 198 धावात आटोपला. त्यांच्या उर्वरित सहा गड्यांनी 135 धावांची भर घातली. उत्तर विभागाच्या डावामध्ये प्रभसिमरन सिंगने 52 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 49, अंकितकुमारने 7 चौकारासह 33, निशांत सिंधूने 2 षटकार आणि 1 चौकारासह 27, हर्षित राणाने 22 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 31, अरोराने 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 23 तसेच शोरेने 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. दक्षिण विभागाच्या गोलंदाजीसमोर उत्तर विभागाचा निम्मा संघ 108 धावात तंबूत परतला होता. दक्षिण विभागातर्फे कविरप्पाने 28 धावात 5 तर शशीकांतने 52 धावात 2 तसेच विशाख, साईकिशोर आणि वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
उत्तर विभागाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण विभागाचा पहिला डाव 54.4 षटकात 195 धावात आटोपला. उत्तर विभाग संघातील सलामीचा फलंदाज मयांक अगरवालने एकाकी लढत देत 115 चेंडूत 10 चौकारासह 76, तिलक वर्माने 101 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 46, वॉशिंग्टन सुंदरने 2 चौकारासह 12, साईकिशोर 27 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमवल्या. उत्तर विभागातर्फे वैभव अरोरा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 3 तर बालतेज सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. केवळ तीन धावांची आघाडी घेतलेल्या उत्तर विभागाने गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 11 षटकात 2 बाद 51 धावा जमावत दक्षिण विभागावर एकूण 54 धावांची आघाडी मिळवली आहे. उत्तर विभागाच्या दुसऱ्या डावालाही चांगली सुरुवात झाली नाही. दक्षिण विभागाच्या विशाखने ध्रुव शोरेचा 5 धावावर तर त्यानंतर कविरप्पाने प्रशांत चोप्राचा 19 धावावर त्रिफळा उडवला. अंकित कालसी 21 तर प्रभसिमरन सिंग 6 धावावर खेळत आहेत. दक्षिण विभागातर्फे कविरप्पा आणि विशाख यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
उत्तर विभाग प. डाव 58.3 षटकात सर्वबाद 198 (प्रभसिमरन सिंग 49, अंकितकुमार 33, निशांत सिंधू 27, हर्षित राणा 31, अरोरा नाबाद 23, कविरप्पा 5-28, शशीकांत 2-52, विशाख, साईकिशोर, वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी एक बळी), दक्षिण विभाग प. डाव 54.4 षटकात सर्वबाद 195 (अगरवाल 76, तिलक वर्मा 46, साईकिशोर 21, वॉशिंग्टन 12, अवांतर 27, अरोरा 3-57, जयंत यादव 3-38, बलतेज सिंग 2-40, हर्षित राणा 2-41), उत्तर विभाग दु. डाव 11 षटकात 2 बाद 51 (शोरे 5, प्रशांत चोप्रा 19, कालसी खेळत आहे 21, प्रभसिमरन सिंग खेळत आहे 6, कविरप्पा आणि विशाख प्रत्येकी एक बळी).









