दोन दिवसांमध्ये बैठकीची शक्यता : निवडणूक आयोगाकडून तयारी
प्रतिनिधी / बेळगाव
जि. पं.- ता. पं. निवडणुकांसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मतदारसंघांच्या विभाजनावरून आक्षेप दाखल करण्यात आले होते. सदर आक्षेप निकालात काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत बेंगळूर येथे मतदारसंघ सीमा आयोग बैठक बोलाविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी भाजप सरकारच्या कार्यकाळात जि. पं. व ता. पं. मतदारसंघ पुनर्रचना करून जाहीर करण्यात आले होते. यावरून काहीजणांनी आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. इतक्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील सरकार बदलले. सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने तत्कालीन सीमा आयोगावर असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यामुळे जि. पं. व ता. पं. मतदारसंघांसाठी नवीन नोटिफिकेशन जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर करण्यात आलेले मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या मनात आल्यास तेच मतदारसंघ पुढे करून नवीन नोटिफिकेशन जाहीर केली जाईल.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांची दखल घेऊन सीमा आयोगाची बैठक बेंगळूर येथे बोलाविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ही बैठक होणार आहे. यासाठी तयारी करण्यात येत आहे. सीमा आयोगाच्या बैठकीत मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत अधिकृत निर्णय होणार आहे. त्यानंतरच नवीन नोटिफिकेशन जाहीर करून निवडणुकीची तयारी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मतदारसंघ अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. असे न झाल्यास लोकसभा निवडणुकीनंतरच यावर विचार केला जाईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्राकडून सांगण्यात येत आहे.









