सातारा :
माण तालुक्यातील पळशी हे गाव 12 हजार लोकसंख्येचे आहे. याच गावात बिअरबार आणि वाईनशॉपीची मागणी यापूर्वी झाली होती. त्या अनुषंगाने गावात विरोधात वातावरण तयार झाले. दारुमुळे होत्याचे नव्हते होते. घराची राखरांगोळी होते. दारुच्या दुकानदारांची माडी उभी रहाते अन् दारु पिणाऱ्याच्या घराची नासाडी होते. त्यामुळे पळशीतल्या महिलांनी कसल्याही परिस्थितीत गावात दारुचे दुकान नकोच यासाठी ग्रामसभा पार पडली. त्यामध्ये सर्व उपस्थित महिलांनी एकमताने आडव्या बाटलीला मतदान करुन गावातून दारुची बाटली हद्दपार केली. याच झालेल्या ऐतिहासिक निर्णयाचे माण तालुक्यासह जिह्यात चर्चा होत आहे.
माण तालुक्यातील पळशी हे गाव अनेक बाबींनी चर्चेत असते. नुकत्याच अवकाळी पावसात एक युवक वाहून गेल्याने ते गाव चर्चेत आले. मात्र, त्याच दिवसापासून गावात दारुबाबत तीव्र घृणा निर्माण झाली. दारुबाबत अगोदरच गावात विरोधाचे वातावरण तयार झाले होते. गावात बिअर बार व वाईन शॉपीची मागणी केली होती. त्या मागणीला विरेध करण्यासाठी पळशीतल्या महिलांनी एकी केली. गावात ग्रामसभा मंदिरात आयोजित करण्यात आली. यावेळी गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, म्हसवड पोलीस उपस्थित होते. या ग्रामसभेत सफुलाबाई साबळे, नंदा सावंत, नंदा भोसले, आशा देवकुळे यांच्यासह दहा महिलांनी दारु कशी वाईट हे सांगितले. तसेच दारू पिल्यामुळे जमीन विकावी लागते. दारू पिल्यामुळे घरात भांडणे होतात. संसार टिकत नाही, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते, या बाबी महिलांनी ग्रामसभेसमोर मांडल्या. आणि एकमताने दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. या महिला ग्रामसभेला 500 महिला व 300 पुरुष सहभागी होते. इथून पुढे गावामध्ये कोणतेही दारू विकणारे दुकान शिल्लक राहणार नाही व दिसल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी महिलांची समिती गठीत करण्यात आली.
ग्रामसभेमध्ये दारू गावातून हाकला, गाव वाचवा, बुलाती है मगर जाती नही, कशापाई दारू पितात अशा आशयाचे बोर्ड घेऊन महिला स्वत: उत्साहाने ग्रामसभेत सहभागी झाल्या होत्या. गावातील महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे, आडवी बाटली झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमुन सोडला. या ग्रामसभेसाठी नागरिक सरपंच शांताबाई खाडे, उपसरपंच केशव मुद्दे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. डॉ. राजेंद्र खाडे यांनी या सभेसाठी विशेष प्रयत्न केले व गाव दारूबंदी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी महिलांनी मांडलेला दारुबंदीचा ठराव वाचून दाखवला. त्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच सभेतच महिलांनी जुगार बंदी व मटका बंदी यांची मागणी केली. गावातील तरुणांनी आणि वृद्धांनी डॉल्बी बंदीची मागणी केली.
- पळशी परिसरात दारु विक्री करणाऱ्यावर होणार कारवाई
गावात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत कडाडून महिलांनी दारुला विरोध केला आहे. एकमताने ठराव केला आहे. असे असताना कोणी पळशी परिसरात दारु विक्री करताना आढळुन आल्यास त्याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्याच्यावतीने कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय अक्षय सोनावणे यांनी दिला.
- भारतीय दलित महासंघाचा पाठपुरावा
भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष बबन ढोले यांनी म्हसवड पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क तसेच पळशी ग्रामपंचायतीला दि. 10 मे रोजी निवेदन दिले होते. त्याच अनुषंगाने हनुमान मंदिरात ऐतिहासिक अशी ग्रामसभा पार पडली, असे लोखंडे यांनी सांगितले.








