सनी देओलचा पुत्र करणार पदार्पण
सनी देओल एकीकडे स्वत:चा चित्रपट ‘गदर 2’चे यश साजरे करत असताना दुसरीकडे त्याचा पुत्र राजवीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राजवीरचा ‘दोनों’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी शेअर केला आहे.

राजश्री प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित ‘दोनों’ या चित्रपटाद्वारे राजवीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात पूनम ढिल्लों यांची कन्या पलोमा देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. पलोमा देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ‘दोनों’ हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दोनों हा चित्रपट प्रेमकहाणीवर आधारित असून राजश्री प्रॉडक्शन्सकडून निर्मित चित्रपटांचा स्वत:चा असा चाहतावर्ग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अवनीश बडजात्या यांनी केले आहे. यापूर्वी सनी देओलचा ज्येष्ठ पुत्र करणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पल पल दिल के पास हा त्याचा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलनेच केले होते. करणसोबत या चित्रपटात सहर बाम्बा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसून आली होती.









