शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी : मार्केटमुळे पिकांना चांगला भाव
बेळगाव : एपीएमसी व जय किसान ही दोन्ही भाजी मार्केट व्यवस्थितरीत्या चालावीत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्था करून द्यावी. दोन्ही भाजी मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही भाजी मार्केटला सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन नेगिलयोगी शेतकरी सेवा संघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी गेल्या 60 वर्षांपासून रविवार पेठ येथील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये व्यापार करत होते. मात्र, तेथे जागा अपुरी पडू लागल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील किल्ला तलावानजीक 3 एकर 20 गुंठे जागेत भाजी मार्केट स्थलांतरित केले.
मात्र, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी व इतर कारणास्तव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये स्थलांतर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. मात्र, एपीएमसी अधिकाऱ्यांनी त्यावेळी भाजी मार्केट स्थलांतर करण्यास देण्यात येणार नसल्याचे लेखी उत्तर दिले होते. याबाबत केआयएडीबी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना व्यापाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी भाजी मार्केट सुरू करण्याबाबत तोंडी सांगितले होते. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जय किसान भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. मध्यंतरी हे भाजी मार्केट एपीएमसी आवारात सुरू करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे व्यापार मंदावला. अनेक दुकाने बंद पडली. तेव्हापासून जय किसान भाजी मार्केट सुरू आहे.
दोन्ही मार्केट सुरू राहण्यासाठी सुविधा द्या
दोन्ही भाजी मार्केटमुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे दोन्ही भाजी मार्केट सुरू रहावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदनाचा स्वीकार केला.









