क्रीडा मंत्रालयाची मान्यता : प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांच्या प्रयत्नांना यश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चीनमध्ये होणाऱ्या हॅंगझू एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाचा सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने विशेष सूट देत भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांनी क्रीडा मंत्रालयाला केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आगामी आशियाई स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ खेळताना दिसतील. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार एशियन गेम्समध्ये केवळ तेच संघ सहभागी होऊ शकतात, जे सांघिक खेळांच्या क्रमवारीत आशियामध्ये पहिल्या आठ संघात असतात. सध्या भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही फुटबॉल संघ पहिल्या आठमध्ये नाहीत. त्यामुळे भारतीय संघाला एशियन गेम्समध्ये सहभागी होता येत नव्हते. या नियमामुळे चार वर्षे खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल याकरता भारतीय फुटबॉल
संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांनी क्रीडा मंत्रालय तसेच पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करून खेळाडूंना स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी ट्विट करून भारतीय फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेच्या सहभागासाठी मान्यता देण्यात आल्याचे जाहीर केले. भारतीय संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी लक्षात घेऊन नियम शिथिल करून त्यांना मान्यता देण्यात आली आहे. भारतीय संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांनी पंतप्रधान तसेच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. भारतीय पुरुष फुटबॉल संघाने मागील महिन्यात सलग तीन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. नेशन्स कप, इंटरकॉन्टिनेन्टल कप व सॅफ कप अशा सलग तीन स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या. तसेच, महिला संघ देखील सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. यामुळे आगामी आशियाई स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. चार संघांना नाकारली परवानगी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने बुधवारी भारताच्या महिला सॉफ्टबॉल, पुरुषांचा वॉटरपोलो, पुरुष हॅण्डबॉल आणि बास्केटबॉल या चार संघांना परवानगी नाकारली.









