चांदीच्या कडय़ासाठी चोरांचे निर्दयी कृत्य
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये रविवारी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका घरात घुसून 108 वर्षीय महिलेचे पाय कापून चोरांनी चांदीचे कडे चोरले आहेत. ही वृद्ध महिला पाय कापल्यावर बाथरुममध्ये वेदनेने विव्हळत होती. कुटुंबीयांना एक तासानंतर या घटनेची माहिती कळली होती. जमुना देवी (108 वर्षे) या मुलगी आणि नातीसोबत राहतात. रविवारी पहाटे चोर त्यांच्या घरात घुसले होते. आरोपींनी जमुना देवी यांना खेचत बाथरुममध्ये नेत तेथे दोन्ही पाय कापून चांदीचे कडे हस्तगत केले आहेत. पीडितेचे मुलगी आणि नात सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना जमुनादेवी बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. जमुना देवींचे दोन्ही पाय कापलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









