अध्याय सविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माणूस जन्माला आल्यावर त्याला कर्म हे करावंच लागतं. ते टाळता येत नाही. वाट्याला आलेलं कर्म माणसानं निरपेक्षपणे करावं म्हणजे त्यातून पाप पुण्याची पुंजी जमा होत नाही. कर्म दोन प्रकारे करता येतं, एक धर्माने म्हणजे नितीन्यायाने केलेलं कर्म आणि दुसरा प्रकार अधर्माचा असतो. अधर्माचे कर्म माणसाला तात्पुरते अडचणीतून सोडवते परंतु त्यामुळे पाप खात्यावर जमा होत असल्याने त्याचा शेवट नरकात होतो. जे लोक कर्म कर्तव्य म्हणून धर्मानुसार पार पडतात ते स्वर्गात जातात परंतु हे कर्म त्यांनी निरपेक्षतेने केले नसल्याने त्याचे फल भोगण्यासाठी त्यांना पुन्हा पृथ्वीवर यावे लागते. ह्याप्रमाणे संसारी लोक स्वर्ग व नरकात भोवऱ्याप्रमाणे गिरक्मया खात असतात. माणसाने धर्माने केलेलं कर्म काही अपेक्षा ठेऊन केलेलं असल्याने त्याला जन्म मृत्युच्या चक्रातून फिरावं लागतंय हे तो लक्षातच घेत नाही. त्यामुळे तो संसारसागरात सदैव गटांगळ्या खात असतो. अशा गटांगळ्या खाणाऱ्या मंडळीना संसार सागरातून सज्जन साधूची नौकाच सुखाने तारून नेते. कामक्रोधरहित शांती हाच या नावेचा अछिद्रपणा होय. ती ब्रह्मज्ञानाने बळकट असल्यामुळे खरी सुखरूप आहे. साधूने यमनियमांचे पालन केलेले असल्याने कामक्रोधादि भयंकर जलचरांचे ह्या नावेपुढे काहीच चालत नाही. त्यामुळे साधक सुखरूप राहतो. तात्पर्य, सत्संग हा सर्वांना तारक आहे. सद्गुऊ सर्वांच्याकडे समदृष्टीने पहात असतात. सगळ्यांच्या वर त्यांची सारखीच कृपा असते. ज्याची जशी श्र्रद्धा असेल त्याला त्याप्रमाणात लाभ मिळतो. उदाहरणार्थ पावसाळा सुऊ होण्यापूर्वी जो शेतकरी जमिनीची मशागत करून शेत नांगरून तयार ठेवतो. पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करतो, त्याचे पिक पाऊस पडल्यावर तरारून येते. त्याप्रमाणे जो सद्गुऊना स्वत:ला समर्पित करतो त्याचा उद्धार लगेच होतो. याउलट जो शेतकरी पाऊस पडल्यावर शेतीचे काम करू असे म्हणून आळसात दिवस काढतो त्याची कामे अपुरी राहतात. त्यामुळे त्याच्या शेताला म्हणावा तसा पावसाच्या पाण्याचा फायदा होत नाही. खरं म्हणजे पाऊस सर्वत्र सारखाच पडत असतो पण जो शेतकरी सावधपणे सर्व तयारी आगाऊ करून ठेवतो त्याला जास्त फायदा होतो. त्याप्रमाणे सद्गुरू सगळ्यांच्या वर सारखीच कृपा करत असतात कारण ते समदृष्टी असतात पण त्या कृपेचा फायदा ज्याची जशी श्र्रद्धा असते त्याप्रमाणात त्याला मिळतो. सद्गुरू हे माझेच सगुण रूप असतात. संसारामध्ये अतिशय गांजलेल्या आणि त्रिविध तापाने तापलेल्या अशा शरणागतांना आश्र्रयस्थान असा मीच एक नारायण असून मी त्यांचे संरक्षण करतो. माझे नामस्मरण केले असता जन्ममरण सहज दूर होते. दु:खाचे भय प्राप्त होण्यापूर्वीच जे सदबुद्धीने साधूची सेवा करतात, त्यांना संसारभयाची आधिव्याधी मुळीच बाधत नाही. संसारांतून तरून जाण्याला सत्संगती हाच खरा आधार आहे. संतांचे भक्तिभावाने चरण धरले असता त्यांच्याकडून दीनांचा उद्धार होतो. जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती देतो, त्याप्रमाणे संतपुरूष स्वरूपाला आणि भगवंतांना पाहण्याची दृष्टी देतात. संत हे अनुग्रहशील देवता आहेत. संत आपले हित इच्छिणारे सुहृद आहेत. संत आपले प्रियतम आत्मा आहेत किंबहुना संत म्हणजे मीच आहे असे समज. ज्याप्रमाणे रात्रीचा सगळा अंध:कार सूर्य आपल्या तेजाने नाहीसा करून टाकतो, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्य उगवला की, तो अविद्येची रात्र निश्चयाने नाहीशी करून टाकतो. सूर्योदय झाला की, चोराचे भय दूर होते, त्याप्रमाणे सत्संगती प्राप्त झाल्याने संसाराचे भय कल्पांतीही उरत नाही. सूर्योदय झाला म्हणजे पक्षी आपली घरटी सोडून देतात, त्याचप्रमाणे सत्संगाचा सूर्योदय झाला म्हणजे जीव आपली देहरूप घरटी सोडून देतात. बाहेरच्या सूर्यकिरणांनी कमलिनी हर्षाने विकसित होतात, त्याप्रमाणे सत्संगरूपी सूर्याच्या प्रकाशाने निर्विकल्प कमलिनी प्रफुल्लीत होते.
क्रमश:









