प्रत्येक संघाला एकेक गुण बहाल, बडय़ा संघांची उपांत्य फेरीची वाट बनली बिकट
वृत्तसंस्था/ मेलबर्न
पारंपरिक प्रतिस्पर्धी यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात होणारा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीचा महत्त्वाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यामुळे या दोन्ही संघांची उपांत्य फेरी गाठण्याची वाट आणखी बिकट बनली आहे. या सामन्याआधी आयर्लंड व अफगाणिस्तान यांचा सामनाही पावसामुळे रद्द करावा लागल्याने त्यांनाही प्रत्येकी गुण मिळाला.
पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसरा सामनाही रद्द झाल्याने प्रेक्षकांची मात्र घोर निराशा झाली. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. शुक्रवारचे दोन्ही सामने पावसामुळे वाया गेल्यानंतर गट एकमधील गुणतक्त्यात 3 गुणांसह इंग्लंड दुसऱया स्थानावर पोहोचले आहे. विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या जेतेपद स्वतःकडेच राखण्याच्या स्वप्नांनाही यामुळे धक्का बसला आहे. त्यांचेही इंग्लंडइतकेच 3 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलिया या गटात चौथ्या स्थानावर असून त्यांचा रनरेट सर्वात कमी आहे. न्यूझीलंड संघ या गटात अग्रस्थानी असून आयर्लंड दुसऱया स्थानावर आहे. गेल्या रविवारी मेलबर्नमध्ये झालेला भारत-पाक ब्लॉकबस्टर सामना वगळता येथे झालेल्या सर्व सामन्यांना पावसाचा फटका बसला आहे.
‘या स्टेडियमवर इतका ओलसरपणा मी याआधी कधीच पाहिला नव्हता. इनर सर्कल व रनअप क्षेत्रात पाण्याचा अंश असल्यामुळे त्यावर खेळणे अशक्यच होते. खेळाडूंची सुरक्षितता आम्हाला महत्त्वाची आहे,’ असे ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरोन फिंच म्हणाला. ‘आदल्या दिवशी झिम्बाब्वेचा एक खेळाडू याच मैदानावर घसरून पडल्याचे आम्ही पाहिले. अशा खेळपट्टीवर धावताना मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या सामन्यासाठी प्रेक्षकांनी बरीच गर्दी केली होती. त्यामुळे संघातील प्रत्येकजण खेळण्यास तयार होता. पण अखेर त्यांची निराशा करावी लागली,’ असेही तो म्हणाला.

कोरोनाची लागण झालेल्या मॅथ्यू वेडबाबत विचारले असता तो म्हणाला की, ‘तो या सामन्यात खेळणार होता. काल त्याला काही लक्षणे दिसत होती. पण खेळण्याइतका तो सक्षम होता,’ असे तो म्हणाला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनेही सामना रद्द झाल्यामुळे निराशा व्यक्त केली. ‘आमच्यासाठी हा बडा सामना होता, प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. पण सामन्यात खेळता आले नाही, याची खूप निराशा वाटते. मात्र आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील सामन्यावर आम्ही आता लक्ष केंद्रित केले आहे. या स्पर्धेत उतरण्याआधी आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे. एक सामना खराब गेला म्हणजे आपला संघ वाईट आहे, असे नव्हे. आपल्याकडे अनेक मॅचविनर्स असून उर्वरित सामन्यांवर आम्ही नजर केंद्रित केली आहे,’ असेही तो आयर्लंडविरुद्ध झालेल्या पराभवासंदर्भात बोलताना म्हणाला.
अफगाण-आयर्लंड सामनाही रद्द
अफगाण व आयर्लंड यांच्यातील सामनाही पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला. मेलबर्नमध्ये दिवसभर पाऊस सुरू असल्याने मैदान कर्मचाऱयांनी खेळपट्टी व परिसरात आच्छादन घातले होते. त्यामुळे नाणेफेकही करण्यात आली नाही. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना एकेक गुण मिळाल्याने उपांत्य फेरी गाठण्याची त्यांनाही संधी मिळाली आहे.
या निकालामुळे आयर्लंड गुणतक्त्यात 3 गुणांसह दुसऱया स्थानावर घसरले असून सरस धावसरासरीच्या जोरावर न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. ‘आम्ही आतापर्यंत स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले असून या सामन्यात खेळण्यास उत्सुक झालो होतो, पण हवामानाबाबत आम्ही काही करू शकत नाही,’ असे आयर्लंडचा कर्णधार अँडी बलबिर्नी म्हणाला. आयर्लंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये सोमवारी होणार आहे. ‘ब्रिस्बेनमधील परिस्थिती वेगळी असेल. तरीही आम्ही वर्ल्ड चॅम्पियन्सना कडवी लढत देणार आहोत,‘ असेही तो म्हणाला.
अफगाणचा सलग दुसरा रद्द सामना
इंग्लंडकडून पराभव स्वीकारलेल्या अफगाणसाठी पावसाचा अडथळा आलेला हा सलग दुसरा सामना आहे. याआधीचा याच मैदानावर झालेला न्यूझीलंडविरुद्धचा त्यांचा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अफगाण संघ 2 गुणांसह सहाव्या स्थानावर असून त्यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. जगातील या सर्वात मोठय़ा मैदानावर खेळण्याची आपल्या संघाची संधी मात्र हुकली, अशी खंत अफगाणचा कर्णधार मोहम्मद नबीने व्यक्त केली. अफगाणची पुढील लढत मंगळवारी लंकेविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये होणार आहे.
आजचा सामना
न्यूझीलंड वि. लंका
स्थळ ः सिडनी, वेळ ः दु.1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क









