तलावात उडी घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ
प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर मंदिरामागील तलावात महिलेसह दोघाजणांनी आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून खडेबाजार पोलीस स्थानकात या दोन्ही घटनांची नोंद झाली आहे.
विजय राजाराम पवार (वय 58) रा. कांगली गल्ली व चित्रलेखा श्रीकांत सराफ (वय 72) रा. दाणे गल्ली, शहापूर अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी सकाळी तलावात दोन मृतदेह आढळले. सुरुवातीला हे दोघे एकाच कुटुंबातील असणार, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर हा संशय दूर झाला.
घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय पवार हे कांगली गल्ली येथील रहिवासी होते. दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना कावीळ झाली होती. आजाराला कंटाळून मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी रात्री 11 नंतर त्यांनी तलावात उडी घेऊन आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 8 वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहेत.
चित्रलेखा सराफ या दाणे गल्ली, शहापूर येथील रहिवासी होत्या. त्यांची मनस्थिती ठीक नव्हती. याच मनस्थितीतून तलावात उडी घेऊन त्यांनी आपले जीवन संपविले आहे. दोन्ही मृतदेहांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.