म्हापशातील जनार्दन सडेकर यांचा मृतदेह सापडला : अन्य एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पडला मृत्युमुखी
सांगे : सांगे तालुक्यातील नेत्रावळी अभयारण्य कक्षेतल्या मैनापी धबधब्यावर काल रविवारी दुपारी दोघे बुडण्यची दुर्दैवी घटना घडली. या दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडल्याने मैनापी धबधबा पूर्ण जोमाने कोसळत आहे. याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक पर्यटक आले होते. यामधील दोघे बुडालेले असून त्यापैकी एका गटातील म्हापसा येथील जनार्दन सडेकर याचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्या गटातील बुडालेल्या एकाचा शोध सुरु आहे. बुडालेली दुसरी व्यक्ती शिवदत्त नाईक ही 27 वर्षांची असून वाडे वास्को येथील आहे, अशी माहिती अग्निशामक दलाकडून मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा येथून एलआयसी अधिकारी आणि कर्मचारी मिळून पंधरा जणांचा गट मैनापी धबधब्यावर सहलीसाठी रविवारी आला होता. सकाळी 11 वा. हा गट धबधब्याकडे पोहोचला होता.
चांगले पोहणाऱ्याने गमावला जीव
एलआयसीच्या गटातील जनार्दन सडेकर या अधिकाऱ्याचा अन्य एका बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बुडून मृत्यू झाला. सडेकर हे चांगले पोहणारे होते. परंतु पाण्याच्या प्रवाहात ते बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकले नाहीत आणि दुर्दैव असे की, स्वत:चेही प्राण गमावून बसले. सडेकर यांचा मृतदेह स्थानिकांनी लगेच पाण्याबाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवून दिला.
शोध मोहिमेत अडचणी
रविवारी सुमारे हजारभर पर्यटक नेत्रावळी अभयारण्यातील मैनापी आणि सावरी धबधब्यांवर सहलीसाठी आले होते. माट्टोनी येथील वन खात्याच्या फाटकाजवळ प्रवेश शुल्क भरून हे पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी गेले होते. त्यामध्ये फोंडा येथील वरील गट होता. बुडालेल्या अन्य एका पर्यटकाचा शोध घेणे उशिरापर्यंत चालू होते. मैनापी धबधब्यावर सुमारे 4.85 किलोमीटरचे अंतर कापून चालत जावे लागत असल्याने प्रशासनाला अडचणीचे होत आहे. तेथे वाहनेही नेता येत नाहीत. वन खात्याच्या फाटकाजवळ अग्निशमन दलाचे वाहन ठेवण्यात आले होते. ही घटना दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडल्याची माहिती इतर पर्यटकांनी दिली. अग्निशामक दल, पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम चालू होती. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त जोरात असल्यामुळे अडचण येत होती. त्यातच रात्र झाल्याने आज सोमवारी शोध घेतला जाणार आहे. नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगेचे मामलेदार गौरीश गावकर संध्याकाळी नेत्रावळीत दाखल होऊन पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्यासमवेत घटनास्थळी रवाना झाले. नेत्रावळीत सध्या वर्षा पर्यटनाला बहर आला असून नेत्रावळी अभयारण्यातील प्रसिद्ध ‘सावरी’ आणि ‘मैनापी’ धबधबे पूर्ण जोमाने कोसळू लागले आहेत. हे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी देशी पर्यटकांची पावले आत्ता धबधब्यांच्या स्थळी वळू लागली आहेत. शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे धबधबे पाहण्यासाठी येत असतात. रविवारी मोठ्या प्रमाणात सावरी आणि मैनापी धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती.
प्रशासनला शुल्क हवे, पण पर्यटनकांना सुरक्षा देत नाही
धबधाब्यांवर होणारी मोठी गर्दी पाहता त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि त्यांना मार्गदर्शन करण्यास एक-दोन सुरक्षा रक्षक अपुरे ठरत असून पुन्हा एकदा पर्यटकाच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. गोव्यातील विविध शहरांतून अनेक पर्यटन आस्थापने पर्यटकांना घेऊन येथे येत असतात. धबधब्यांवर पर्यटकांची संख्या मोठी राहत असली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. वनखाते प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्कापोटी 100 ऊपये आणि वाहनापोटी वेगळे शुल्क आकारत असले, तरी सुरक्षेचा येथे बोजवारा उडालेला आहे असे पर्यटकांनी सांगून या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्य म्हणजे सध्या धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने पर्यटकांना पाण्यात जाण्यापासून रोखायला हवे होते. पण पर्यटकांना धबधब्याकडे सोडण्याच्या बाबतीत कोणतेच नियंत्रण नसल्याने एकाच वेळी गर्दी होते, अशी माहिती मिळाली आहे. एका पर्यटकाने तर संताप व्यक्त करताना धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट पुरविण्यात यावे, अशी मागणी केली. वरील दोन्ही धबधब्यांवर यापूर्वी देखील पर्यटकांना बुडून मृत्यू येण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना पोलीस बंदोबस्तही नसतो, अशी माहिती मिळाली आहे. रविवारी हजारभर पर्यटक धबधब्यांवर आल्याने सुमारे दीड लाखांहून अधिक कमाई वन खात्याने केलेली असली, तरी दोन व्यक्ती बुडण्याचा दुर्दैवी प्रसंग घडल्याने शोककळा पसरली.









