वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युवा बॅडमिंटनपटू बोर्निल आकाश चांगमाइने येथे झालेल्या आशिया यू-17 व यू-15 कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये यू-15 मुलांच्या गटाचे जेतेपद पटकावले. असे यश मिळविणारा बोर्निल हा भारताचा केवळ दुसरा खेळाडू आहे. चीनमधील चेंगडू येथे ही स्पर्धा झाली. यू+27 मुलींच्या अंतिम फेरीत तन्वी शर्माला पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्यपदक मिळाले.
अंतिम फेरीत त्याने चीनच्या खेळाडूचा पराभव केला. 13 वर्षीय बोर्निलने अतियश संयम व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन पेले, विशेषत: पहिल्या गेममध्ये. त्याने फॅन हाँग झुआनवर 21-19, 21-13 अशी 34 मिनिटांच्या खेळात मात करून सुवर्ण मिळविले. आसामचा बोर्निल ही स्पर्धा जिंकणारा दुसरा युवा खेळाडू आहे. यापूर्वी 2013 मध्ये सिरिल वर्माने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. मुलींच्या यू-17 स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला अंतिम फेरीत थायलंडच्या यातावीमिन केतक्लिएंगकडून 17-21, 21-11, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पराभूत झाली असली तरी तन्वी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी दुसरी मुलगी बनली आहे. याआधी उन्नती हुडाने गेल्या वर्षी थायलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. पण तिलाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
या स्पर्धेत बोर्निलने सातत्यपूर्ण खेळ करताना उपांत्य फेरीत आपल्याच देशाच्या जगशेर सिंग खनगुराला हरविले होते. बोर्निलच्या यशाने कनिष्ठ स्तरावर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंत आणखी एकाची भर पडली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतील स्पोकेन येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये आयुष शेट्टीने कांस्यपदक मिळविले होते. त्याचप्रमाणे चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताच्या बॅडमिंटनपटूंनी भरघोस यश मिळविले. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज यांनी ऐतिहासिक सुवर्ण मिळविताना जागतिक अग्रस्थानावरही झेप घेतली. याशिवाय एकेरीत एचएस प्रणॉयने शानदार प्रदर्शन करीत या स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला.









