प्रतिनिधी /फोंडा
बोरी पंचायत मंडळातर्फे विधवा सन्मान ठराव संमत करण्यात आला. विधवा महिलांना समाजात आदर व सन्मान प्राप्त व्हावा तसेच अनेक वर्षांची ही कुप्रथा कायमची बंद व्हावी, यासाठी आता बोरी पंचायतीनेही पुढाकार घेतला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी एक दिवस आधी शनिवारी क्रांतीदिनानिमित्त झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.
पतीच्या निधनावेळी पत्नीला विधवा म्हणून घोषित करणाऱया काही अपप्रथा पूर्वापार चालत आल्या असून त्यांना कायमची बंदी घालण्यासाठी गोव्यातील विविध गावांमध्ये जागृती सुरु झाली आहे. यापूर्वी पेडणे तालुक्यातील कोरगाव, धारगळ व मोरजी पंचायतीने असे ठराव घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोरी पंचायतीने हा ठराव घेऊन एक चांगला पायंडा पाडलेला आहे, असे सरपंच ज्योती नाईक यांनी सांगितले.
गोव्यातील काही मोजक्याच पंचायतीने असा ठराव संमत केला असून फोंडा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीमधून सर्वात आधी शिरोडा पंचायतीने असा ठराव घेतला होता. आता बोरी पंचायतीनेही त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. यावेळी उपसरपंच दिपिका नाईक, पंचसदस्य सुनील सावकार, विनय पारपती, रामदास गावडे, कमलाकांत गावडे व रुपाली नाईक हे उपस्थित होते.









