लोटलीचे ग्रामस्थ आक्रमक : ग्रामसभेत घेतला ठराव
मडगाव : बोरीच्या नवीन पुलासाठी खाजन शेती नष्ट होत असल्यास हा पुलच नको अशी भूमिका लोटलीतील ग्रामस्थांनी रविवारी घेतली. लोटली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तसा ठराव घेण्यात आला. हल्लीच सरकारने बोरीच्या नव्या पुलासाठी हिरवा कंदिल दाखविला होता. तसेच या पुलाच्या बांधकामांसाठी भू-संपादन अधिसूचना जारी करण्यात आली होती. बोरीच्या नवीन पुलासाठी मोठ्या प्रमाणात खाजन शेतीचा वापर केला जाणार असल्याचे सरकारने जारी केलेल्या भू-संपादन अधिसूचनेतून स्पष्ट झाले होते. त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. खाजन शेती नष्ट करून नवीन पुलाचे बांधकाम हाती घेऊच नये असे मत शेतकऱ्यांनी मांडले आहे.
जर खाजन शेती मातीचा भराव टाकून बुजविली तर पावसाळ्यात संपूर्ण लोटली गांव पूरग्रस्त होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रस्थावित नव्या बोरी पुला पर्यंत जाण्यासाठी खाजन शेतीतून रस्ता तयार करावा लागणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून खाजन शेती बुजावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काल ग्रामसभेत जोरदार हरकत घेतली. ग्रामसभेच्या आधी लोटलीतील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी प्रस्तावित भू-संपादन केल्या जाणाऱ्या जागेपासून भू-संपादनाला विरोध असल्याचे फलक घेत मोर्चा काढला व नंतर सर्वजण ग्रामसभेत सहभागी झाले. लोटली ग्रामपंचायतीने 17 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामसभेला उपस्थित राहून पुलासाठी संपादीत होणारी जागा व आणखी काही पर्याय आहे का ? याची माहिती देण्यास सांगितले होते. त्यानंतरही बांधकाम विभागाकडून भू-संपादनाची अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.
जैवविविधता नष्ट होणार…
खाजन शेतीसह मासे उत्पादन होत असलेले पाणवठे आणि जैवविविधता नष्ट होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सर्वेक्षण अहवालात याची कोणतीही नोंद केलेली नाही. गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या खाजन शेत जमिनी कसून चालतो. त्याच्या बाबतही विचार केला गेला नाही. पर्यावरणावर कोणता परिणाम होणार हे जाणून घेण्यापूर्वी संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली. दोन डोंगरकड्यांवरच्या पाण्याचा प्रवाह कसा वाहणार याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. मडगाव-फोंडा मार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रस्ताविक मार्गाचा पर्याय चुकीचा असून हा मार्ग जास्त लांबीचा होणार. तसेच या ठिकाणी कृषी क्षेत्रातील उत्पादन जास्त आहे.









