बेकिनकेरे येथे पाणीसाठ्यासाठी ग्रामपंचायतीची धडपड
बेळगाव : बेकिनकेरे येथील सार्वजनिक विहिरीत बोअरवेलची खोदाई करून पाणीसाठा करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. 14 व्या वित्त आयोगांतर्गत ही खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे विहिरीतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे गावात सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती ग्राम पंचायतने दिली आहे. डोंगरपायथ्याशी सार्वजनिक विहिरींची खोदाई करण्यात आली होती. मात्र या विहिरीला मुबलक पाणीसाठा नव्हता. त्यामुळे गावात पाण्याची समस्या गंभीर बनत आहे. याची दखल घेऊन ग्रा. पं. सदस्य जोतिबा धायगोंडे, राजू सावंत यांनी विशेष प्रयत्न करून विहिरीत बोअरवेलची खोदाई केली आहे. पूर्वी विहिरीतून पंधरा मिनिटे पाणी येत होते. आता त्यात वाढ होऊन 45 मिनिटे पाणी येत आहे. गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चार पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळेच ग्रा. पं. ने सार्वजनिक विहिरीत पाण्यासाठी काम सुरू केले आहे.









