वृत्तसंस्था /अगरतळा
त्रिपुरा सरकारने राज्यातील 75 सीमावर्ती गावांना स्वातंत्र्यलढ्यादरम्यान स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली आहे. 75 सीमावर्ती गावांचे नाव बदलण्याची योजना ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या हिस्स्याच्या स्वरुपात सुरु केली जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठीचा हा एक पुढाकार असणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाचे स्मरण करण्याचा कार्यक्रम जुलैमध्ये सुरू होत 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सर्व 8 जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या 75 सीमावर्ती गावांची ओळख जिल्हास्तरीय समित्यांकडून केली जाईल. प्रशासनाने यापूर्वी राज्यातील स्वातंत्र्यसेनानी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची एक यादी तयार केली होती अशी माहिती सांस्कृतिक विभागाचे सचिव पी.के. चक्रवर्ती यांनी दिली आहे.









