खानापुरात हुतात्मादिनी हुतात्म्यांचे स्मरण : म. ए. समितीच्यावतीने कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर अभिवादन

प्रतिनिधी /खानापूर
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आजतागायत अनेकांनी बलिदान दिले आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी मराठी अस्मितेसाठी म. ए. समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून सीमाप्रश्न सोडवून घेणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत गोपाळराव देसाई यांनी कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर अभिवादन करताना व्यक्त केले. प्रारंभी कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी एकीच्या माध्यमातून समितीचा भगवा झेंडा पुन्हा डौलाने तालुक्यात फडकला पाहिजे. आज हुतात्मादिनी सर्वांनी हुतात्म्यांचे स्मरण करून एकत्र राहणे गरजेचे आहे. आपण सर्वजण एक झालो आहोत, हीच एकी विरोधकांच्या छातीत धसका भरविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सर्वांनी एकसंघ राहून करणे काळाची गरज आहे. सीमाभागातील मराठी संवर्धनासाठी समितीच्या माध्यमातून काम होऊ शकते. समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहून सीमाप्रश्न सुटेपर्यंत प्रामाणिक राहणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल. हुतात्मादिनी आपण भगव्या झेंड्याशी व मराठीशी प्रामाणिक राहणे काळाची गरज आहे. राष्ट्रीय पक्ष इंग्रजांची भूमिका वठवत आहेत. यासाठी तालुक्यात राजकीय पक्षांना थारा देता कामा नये.
ज्येष्ठ नेते मारुती परमेकर म्हणाले, मराठी अस्मितेसाठी आपण सर्वांनी मतभेद बाजूला सारून एकत्र राहणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाईही गरजेची आहे.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, समितीच्या लढ्याला त्यागाचा इतिहास आहे. सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र राहूया आणि तालुक्यात पुन्हा समितीचा भगवा झेंडा डौलाने फडकूया. समितीच्या झेंड्याखाली एकदिलाने कार्यरत राहू आणि सीमाप्रश्न सोडवून घेऊ. तालुक्यात समितीचा झेंडा पुन्हा फडकावणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल.
त्याचबरोबर विलास बेळगावकर, रणजित पाटील, निरंजन सरदेसाई, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, यशवंत बिरजे, जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, जगन्नाथ बिरजे, रामा खांबले, भास्कर पाटील आणि प्रभाकर बिरजे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
यावेळी गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, बाळाराम शेलार, नारायण कापोलकर, आबासाहेब दळवी, रामचंद्र पाटील, प्रभाकर बिरजे, देवाप्पा गुरव, हणमंत गुरव, शिवाजी पाटील, श्रीकांत दामले, रुक्माण्णा झुंजवाडकर, पुंडलिक कारलगेकर, अमृत शेलार, सुनील पाटील, तुळजाराम गुरव, रमेश देसाई, सदानंद पाटील, मऱ्याप्पा पाटील, म्हात्रू धबाले, मारुती गुरव, प्रल्हाद घाडी, राजाराम देसाई, महांतेश पाटील, ए. बी. मुरगोड, दत्ता गावडे, पुंडलिक पाटील, बाबुराव पाटील, जयसिंगराव पाटील, गोपाळ पाटील, गणेश पाटील, शामराव पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, पुंडलिक पाटील, भैरू कुंभार, संतोष पाटील, दीपक देसाई, प्रवीण पाटील, अर्जुन देसाई, लक्ष्मण पाटील, वसंत नावलकर आदी समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुन्हा वेगळे गट असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर तालुक्यात दोन्ही गटांना एकत्र करून नवे पदाधिकारी जाहीर करत एकीची घोषणा केली. मात्र, काही मोजक्याच लोकांनी सकाळी समितीचे अभिवादन झाल्यानंतर पुन्हा वेगळे अभिवादन करत गट असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे, अशी चर्चा यावेळी करण्यात येत होती.









