कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.सीमाप्रश्नाचा वाद न्यायप्रविष्ट आहे. पण या प्रश्नावरुन वर्षातून एकदा तरी कर्नाटकात भडका उडतो. काही कन्नड संघटनांकडून बंद पाळण्यासह आंदोलन केले जाते. त्यावेळी त्याचा फटका महाराष्ट्राच्या एसटीला बसतो.यंदाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सात दिवस यावरुन वाद निर्माण झाला. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला 14 लाख 58 हजार रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न गेली 65 वर्षे सुरु आहे. सीमा भागातील नागरिकांची महाराष्ट्रात हा भाग समाविष्ट करण्याची मागणी आहे. या मागणीसाठी रस्त्यावरील लढाईबरोबर न्यायालयीत लढाही सुरु आहे. पण न्यायालयीन लढा धीम्या गतीने सुरु आहे. यामुळे सीमाप्रश्न अजून तरी जैसे थे आहे. यावरुन वर्षातून एकदा तरी वाद उफाळून येतो. कर्नाटकातील काही संघटना या प्रश्नावरुन सीमाभागात आदोलन करतात. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी चालक व वाहकाला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मारहाण करण्यात आली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आणि त्याचा परिणाम दोन्ही राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूकीवर झाला. एसटीचे नुकसान नको म्हणून दोन्ही राज्यातील बसेस बंद ठेवण्यात आल्या.या बंदचा फटका कोल्हापूर विभागाला बसला. 22 ते 27 फेब्रुवारी असे सहा दिवस कोल्हापूर विभागातील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.त्यानंतर 22 मार्च रोजी पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्याने कोल्हापूर विभागाने बससेच्या थांबवल्या होत्या.या कालावधीत कोल्हापूर विभागाच्या कर्नाटकात जाणाऱ्या 1610 फेऱ्या रद्द झाल्या,तर 14 लाख 58 हजार 142 रुपयांचे उत्पन्न बुडाले.ज्या ज्या वेळी सीमाप्रश्नाचा वाद निर्माण होतो त्यावेळी झळ मात्र एसटीलाच बसते.
- यंदा सात दिवस कर्नाटकात जाणाऱ्या बसवर परिणाम
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर आंदोलन झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही राज्यातील बससेवेवर होतो.यामुळे प्रवाशांचे हाल होते.फेब्रुवारी महिन्यात सहा दिवस आणि मार्च महिन्यात एक दिवस कोल्हापूर विभागातून सीमाभागात धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.यामुळे त्या काळात कोल्हापूर विभागाचे 14 लाख 58 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले.
संतोष बोगरे–विभागीय वाहतूक अधिकारी
अ.क्र. विभाग दिनांक फेऱ्या कि.मी. बुडालेले उत्पन्न
1 कोल्हापूर 22.2.205 38 1859.3 71,378.5
2 23.2.2025 400 10058 360981.62
3 24.2.2025 320 7467 2,94797.16
4 25.2.2025 400 7042 262174
5 26.2.2025 118 4327 146512
6 27.2.2025 12 1350 48,101
7 22.3.2025 322 8098 2,74,198
एकूण– 1610 40,201 14,58,142
- एसटीसह दोन्ही राज्यातील प्रवाशांना फटका
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद उफाळून आल्यास प्रथम लक्ष्य होते ते दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेस.यामुळे दोन्ही राज्यात शांतता निर्माण होत नाही तोपर्यंत बसेस बंद ठेवल्या जातात.याचा फटका मात्र दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसतो.








