वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णा याने आपल्या डेव्हिस चषक टेनिस कारकीर्दीच्या समारोपाचे संकेत दिले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात मोरोक्को आणि भारत यांच्यात डेव्हिस चषक लढत भारतात खेळवली जाणार आहे. सदर डेव्हिस लढत उत्तर प्रदेशमध्ये आयोजित केली आहे. रोहन बोपण्णाच्या डेव्हिस चषक टेनिस कारकीर्दीतील ही शेवटची लढत राहिल.
येत्या सप्टेंबर महिन्यात भारत आणि मोरोक्को यांच्यात ही डेव्हिस चषक लढत आयोजित केली असून अखिल भारतीय टेनिस संघटनेने या लढतीचे यजमानपद यापूर्वीच उत्तरप्रदेशला दिले असल्याने कर्नाटकाच्या रोहन बोपण्णाला आपल्या डेव्हिस चषक कारकीर्दीचा शेवट बेंगळूरच्या घरच्या टेनिस कोर्टवर करता आला नाही. 43 वर्षीय बोपण्णा हा भारताचा दुहेरीतील अव्वल टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. 2002 साली बोपण्णाने डेव्हिस चषक स्पर्धेत आपले पदार्पण केले. दरम्यान तो एटीपी टूरवरील या डेव्हिस चषक स्पर्धेत आतापर्यंत 32 लढतीत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या बोपण्णाचे वास्तव्य लंडनमध्ये आहे. सप्टेंबरमध्ये होणारी मोरोक्कोविरुद्धची डेव्हिस लढत ही आपल्या टेनिस कारकीर्दीतील शेवटची राहिल असे बोपण्णा वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
2002 पासून बोपण्णाने भारतीय डेव्हिस चषक संघातील आपले स्थान कायम राखले आहे. जवळपास 20 वर्षांच्या टेनिस कारकीर्दीमध्ये रोहन बोपण्णाने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर अनेक एटीपी स्पर्धांमध्ये दुहेरीतील अजिंक्यपदे मिळवली आहेत. भारतीय टेनिस क्षेत्रामध्ये आतापर्यंत डेव्हिस चषक स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 58 लढतीत लियांडर पेसने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यानंतर जयदीप मुखर्जीने 43, रामनाथन कृष्णनने 43, प्रेमजित लालने 41, आनंद अमृतराजने 39, महेश भुपतीने 35, विजय अमृतराजने 32 लढतीत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. रोहन बोपण्णाची मोरोक्कोविरुद्धची होणारी 33 वी डेव्हिस चषक लढत आहे. बोपण्णा विजय अमृतराजला मागे टाकणार आहे. डेव्हिस चषक स्पर्धेत आतापर्यंतच्या 32 लढतीत बोपण्णाने 12 एकेरी तर 10 दुहेरीचे सामने जिंकले आहेत. 43 वर्षीय बापण्णा आजही एटीपी टूरवरील स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत आहे. एटीपी टूरवरील 1000 दर्जाच्या मास्टर्स सिरीज स्पर्धेत गेल्या मार्चमध्ये इंडियन्स वेल्स येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेला बोपण्णा हा सर्वात वयस्कर टेनिसपटू म्हणून नोंदला गेला आहे. बोपण्णाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा विक्रम मोडला आहे. नेस्टरने 2015 साली वयाच्या 42 व्या वर्षी सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली होती. बोपण्णाने वयाच्या 43 व्या वर्षी इंडियन्स वेल्स स्पर्धा जिंकुन नेस्टरचा विक्रम मोडीत काढला आहे.
2019 साली डेव्हिस चषक स्पर्धेच्या रुपरेषेत बदल करण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीय डेव्हिस चषक संघाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विश्व गट 2 मध्ये पदोन्नतीला सामोरे जावे लागले. गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या डेव्हिस चषक लढतीत डेन्मार्कने भारताचा 3-2 असा पराभव केला होता. डेव्हिस चषक स्पर्धेच्या गेल्या 6 लढतीपैकी भारताला 4 लढती गमवाव्या लागल्या. दरम्यान भारताने या स्पर्धेत कझाकस्तानमधील लढतीत पाकिस्तानचा तर नवी दिल्लीतील लढतीत डेन्मार्कचा पराभव केला होता.









