वृत्तसंस्था/ रोम
भारताचा अनुभवी स्टार रोहन बोपण्णा व त्याचा झेकचा साथीदार अॅडम पावलस्की यांनी येथे सुरू असलेल्या रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
बोपण्णा-पावलस्की यांना येथे सहावे मानांकन मिळाले असून त्यांनी न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस व क्रोएशियाचा निकोला मेकटिच यांच्यावर 4-6, 7-6 (7-5), 10-4 अशी सुपरटायब्रेकरमध्ये मात केली. पुढील फेरीत त्यांची लढत ग्रेट ब्रिटनच्या जो सॅलिसबरी व नील स्कुपस्की यांच्याशी होणार आहे. भारताच्या युकी भांब्रीला मात्र पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. अमेरिकेच्या रॉबर्ट गॅलोवेसमवेत खेळताना त्याला स्पेन व अर्जेन्टिनाच्या मार्सेल ग्रॅनोलर्स व होरासिओ झेबालोस यांच्याकडून 1-6, 2-6 असा पराभव पत्करावा लागला.









