वृत्तसंस्था/ लंडन
भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवित विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
सहावे मानांकन मिळालेल्या या जोडीने अर्जेन्टिनाच्या गुलिर्मो डुरान व टॉमस मार्टिन एचेव्हेरी यांच्यावर 6-2, 6-7 (5-7), 7-6 (10-8) अशी चुरशीच्या लढतीत मात केली. निर्णायक सेटमध्ये बोपण्णा-एब्डन ब्रेकवेळी 3-1 असे आघाडीवर होते. तिसऱ्या सेटमध्ये प्रतिस्पर्धी जोडीने 4-4 अशी बरोबरी साधली होती. 12 व्या गेममध्येश एब्डनच्या सर्व्हिसवर त्यांना दोनदा मॅच पॉईंट्सची संधी मिळाली होती. टायब्रेकमध्ये बोपण्णा-एब्डन जोडीने आघाडी घेतल्यानंतर अर्जेन्टिनाच्या जोडीनेही मुसंडी मारली. बोपण्णाने एकहाती बॅकहँड फटका मारत सामना आपल्या बाजूने फिरविला. या पॉईंटवर प्रेक्षकांनीही त्याचे जल्लोष करून कौतुक केले. प्रेक्षकांमध्ये माजी टेनिसपटू महेश भूपतीही उपस्थित होता. त्यांची पुढील लढत ब्रिटनच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या जेकब फियर्नले व जोहानस मंडे यांच्याशी होणार आहे.
अन्य एका लढतीत भारताच्या श्रीराम बालाजी व एन. जीवन यांना दुसऱ्या मानांकित क्रोएशियाच्या इव्हान डोडिगा व अमेरिकेच्या ऑस्टिन क्रायसेक यांच्याकडून 6-7 (5-7), 4-6 असा पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.









