बालाजी-मार्टिनेझ पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत रविवारी येथे भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे या स्पर्धेत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सिकन साथिदार मिगेल मार्टिनेझ यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात द्वितीय मानांकित जोडी बोपण्णा आणि एब्डन यांनी ब्राझीलच्या लूझ आणि झोर्मन यांचा 7-5, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना तब्बल 2 तास चालला होता. बोपण्ण आणि एब्डन या जोडीला या सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. बोपण्णा आणि एब्डन यांनी पहिला सेट जिंकल्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये बोपण्णा आणि एब्डन यांनी आपली सर्व्हिस अधिक वेळ राखत तसेच अचूक फटक्याच्या जोरावर विजय हस्तगत केला.
पुरुष दुहेरीच्या अन्य एका दुसऱ्या फेरीतील सामन्यात भारताचा एन. श्रीराम बालाजी व त्याचा मेक्सिकन साथिदार मार्टिनेझ यांनी फ्रान्सच्या डेन अॅडेड व थिओ अॅरिबेग यांचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा दुसरा फेरीतील सामना पावणे दोन तास चालला होता. मात्र भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथिदार ओलिव्हेटी यांचे दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.