वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीतील ट्युरिन येथे 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेसाठी भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यू एब्डन यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. एटीपीची ही फायनल्स टेनिस स्पर्धा प्रत्येक वर्षीच्या टेनिस हंगामाअखेरीस खेळविली जाते.
बोपन्ना आणि एब्डन या जोडीने चालू वर्षीच्या टेनिस हंगामात विविध आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. एटीपी फायनल्स स्पर्धेत पुरुष दुहेरीत बोपन्ना-एब्डन, डोडीग-क्रेजीसेक, कूलहॉप-स्कूपेस्की यांचाही समावेश आहे. डोहामध्ये झालेल्या एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत तसेच इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत बोपन्ना आणि एब्डन यांनी दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले आहेत. तसेच या जोडीने अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत त्याचप्रमाणे माद्रिदमधील 1000 दर्जाच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. निटो एटीपी फायनल्स स्पर्धेत बोपन्नाने चौथ्यांदा प्रवेश मिळविला आहे.









