वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्बियाचा द्वितीय मानांकित जोकोविच तसेच अमेरिकेचा बेन शेल्टन, टॉमी पॉल यांनी तर पुरुष दुहेरीत भारताचा रोहण बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोविचने आपल्या देशाच्या लेस्लो डिजेरीचा 4-6, 4-6, 6-1, 6-1, 6-3 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात डिजेरीने दर्जेदार खेळ करत जोकोविचला 5 सेट्समध्ये विजयासाठी चांगलेच झुंजवले. 2006 साली या स्पर्धेत जोकोविचचे आव्हान सुरुवातीच्या फेरीमध्येच समाप्त झाले होते. जोकोविचने तब्बल दोन वर्षानंतर या स्पर्धेत आपले पुनरागमन करताना चौथी फेरी गाठली असून आता तो आपल्या 24 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे वाटचाल करीत आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील शनिवारी झालेल्या एक सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनने कॅरेटसेव्हचा 6-4, 3-6, 6-2, 6-0 असा पराभव करत चौथी फेरी गाठली आहे. हा सामना अडीच चालला होता. टॉमी पालने या सामन्यात 26 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.चालू वर्षीच्या टेनिस हंगामात टोमी पालने पहिल्यांदाच या ग्रँडस्लॅम स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पॉलने तिसऱ्या फेरीतील सामन्यात स्sपेनच्या फोकिनाचा 6-1, 6-0, 3-6, 6-3 असा पराभव केला.
रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडनने पुरुष देरीची चौथी फेरी गाठली आहे. सहावी मानांकित जोडी बोपण्णा आणि एबडन यांनी रशियाचा सेफुलिन आणि कझाकस्तानच्या गोलुबेव्ह यांचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. आता पुढील फेरीत बोपण्णा आणि एब्डन यांची गाठ ब्रिटनच्या कॅश आणि पॅटेन यांच्याबरोबर होणार आहे.

महिलांच्या विभागात कॅरोलिनी वोझनियाकीने एकेरीची चौथी फेरी गाठताना अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीचा 4-6, 6-3, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. 2019 नंतर वोझनियाकीने या स्पर्धेत आपला पहिल्यांदाच सहभाग दर्शवला आहे. अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीने 2021 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.









