वृत्तसंस्था/ मियामी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद मिळवून एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत अग्रस्थानावर पुन्हा झेप घेतली आहे.
पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात 44 वर्षीय रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डन यांनी अंतिम सामन्यात क्रोएशियाचा इव्हान डोडीग आणि अमेरिकेचा ऑस्टिन क्रेजीसेक यांचा 6-7 (3-7), 6-3, 10-6 अशा सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेतील विजेतेपदामुळे बोपण्णाने एटीपीच्या पुरूष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थान पटकाविले आहे. गेल्या वर्षी बोपण्णाने आपल्या वयाच्या 43 व्या वर्षी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळवून अशी कामगिरी करणारा तो सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला होता. ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत तसेच मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो, अशी प्रतिक्रिया बोपण्णाने या सामन्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली. 2024 च्या टेनिस हंगामातील जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत बोपण्णाने पहिल्यांदाच पुरूष दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. बोपण्णाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 14 वेळा एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे बोपण्णाचा एटीपी टूरवरील स्पर्धेतील हा 63 अंतिम सामना आहे. बोपण्णाने पुरूष दुहेरीत आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये 26 अजिंक्यपदे विविध साथिदारांसमवेत मिळविली आहेत. यापूर्वी भारताच्या लियांडर पेसने एटीपी टूरवरील सर्व म्हणजे 9 मास्टर्स स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर असा पराक्रम करणारा बोपण्णा हा भारताचा दुसरा टेनिसपटू आहे. मियामी स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे आता सोमवारी घोषित होणाऱ्या एटीपीच्या पुरूष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत बोपण्णा आणि एब्डन ही जोडी अग्रस्थानावर राहिल.









