अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस : टॉप सिडेड स्वायटेक, वोझ्नियाकी यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा जोकोविचने एकेरीत तर भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यू एब्डन यांनी दुहेरीत त्याचप्रमाणे महिला एकेरीत अमेरिकेची कोको गॉफ आणि ओस्टापेंको यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकचे या स्पर्धेतील जेतेपद स्वत:कडे राखण्याचे स्वप्न संपुष्टात आले.
पुरूष दुहेरीच्या सामन्यात सहावी मानांकित जोडी रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डन यांनी ब्रिटनच्या ज्युलियन कॅश आणि हेन्री पॅटेन यांचा 6-4, 6-7 (5-7), 7-6 (10-6) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हा तिसऱ्या फेरीतील सामना अडीच तास चालला होता. गेल्या जुलै महिन्यात झालेल्या विम्बल्डन ग्रॅँड स्लॅम टेनिस स्पर्धेत बोपण्णा आणि एब्डन यांनी उपांत्य फेरी गाठली होती. तिसऱ्या फेरीतील सामन्यात बोपण्णा आणि एब्डन यांनी 13 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली होती. मात्र पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांबरी आणि साकेत मिनेनी यांचे आव्हान पहिल्यास फेरीत संपुष्टात आले होते. बोपण्णाला या स्पर्धेत मिश्र दुहेरीत हार पत्करावी लागली. मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि टेलर टाऊनसेंड यांनी बोपण्णा व त्याची इंडोनेशियन साथिदार अॅलडिला सुझीलादी यांचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने 40 वर्षीय गोजोचा 6-2, 7-5, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. जोकोविचने आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून तो आता विक्रमी 24 वे ग्रँड स्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अमेरिकेच्या नवव्या मानांकित टेलर फ्रीट्जशी होणार आहे.
महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ आणि लॅटव्हियाची एलेना ओस्टापेंको यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. गॉफने कॅरोलिन वोझ्नियाकीचा तर ओस्टापेंकोने पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.
महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात 19 वर्षीय कोको गॉफने 33 वर्षीय वोझ्नियाकीचा 6-3, 3-6, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोन दशकानंतर अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सलग दोन वेळेला महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी कोको गॉफ ही अमेरिकेची दुसरी महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी अमेरिकेच्या माजी टॉप सिडेड सेरेना विलियम्सने हा पराक्रम केला होता. महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात लॅटव्हियाच्या 26 वर्षीय ओस्टापेंकोने इगा स्वायटेकचा 3-6, 6-3, 6-1 असा फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेतील विद्यमान विजेती स्वायटेकला यावेळी मात्र आपले जेतेपद राखता आले नाही. स्वायटेकच्या पराभवामुळे आता महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत द्वितीय मानांकित साबालेंका स्वायटेकला पहिल्या स्थानावरुन खाली खेचत अग्रस्थान मिळवेल. ओस्टापेंको आणि गॉफ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.