272 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम ः 3.15 कोटी रुपये सुरुवातीची किंमत
नवी दिल्ली
जगातील पहिल्या उडणाऱया दुचाकीचे बुकिंग सुरु झाले आहे. (फ्लाइंग मोटरसायकल) ही मोटरसायकल 30 मिनिटात ताशी 96 किमी वेगाने उडू शकणार असल्याची माहिती आहे. या उडत्या बाईकचे ‘स्पीडर’ असे नाव आहे. त्याची सुरुवातीची किंमत 3.15 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
136 किलो वजनाची दुचाकी 272 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असेल. दुचाकीला दुरुनही नियंत्रित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. उडणारी दुचाकी अमेरिकेच्या जेटपॅक एव्हिएशन कंपनीने बनवली आहे. मूळ डिझाइनमध्ये चार टर्बाइन होते, परंतु अंतिम उत्पादनात आठ टर्बाइन असतील.

प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा
जेटपॅक एव्हिएशन जगातील पहिल्या उडणाऱया मोटरसायकलची उड्डाण चाचणी घेत आहे. त्याला यूएस फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनकडून प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. 2-3 वर्षात कंपनीची 8 जेट इंजिन असलेली स्पीडर फ्लाइंग बाईक बाजारात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
उपयुक्त वाहन
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लाइंग बाईक प्रत्यक्षात एअर युटिलिटी व्हेईकल आहे. म्हणजेच, वैद्यकीय आणीबाणी यांसारख्या उद्देशांसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. मालवाहू विमान म्हणून लष्करी बाजारपेठेसाठी मानवरहित आवृत्ती देखील विकसित केली जात आहे. ते ताशी 400 मैल वेगाने जमिनीपासून 100 फूट उंच उडू शकणार असल्याची माहिती दिली आहे.









