उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बुकी अनिल जयसिंघानी याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.
विशेष न्यायाधीश डी.डी. अलमाले यांनी जयसिंघानी यांना 50 हजार रूपयांचे वैयक्तिक जातमुचलक आणि त्याच रकमेत जामीन मंजूर केला. जयसिंघानी यांना 20 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. तर त्यांची मुलगी अनिक्षा हिला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनिक्षाला 27 मार्च रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता.
मलबार हिल पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, अनिल जयसिंघानी यांच्या मुलीने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला असा दावा केला आहे.
एक फॅशन डिझायनर म्हणून, अनिक्षाने नोव्हेंबर 2021 मध्ये अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री केली होती. आपली आई वारली असून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर अवलंबून असल्याचे सांगून अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एफआयआर नुसार, अनिक्शाने तक्रारदाराला तिचे लेबल लावण्याची विनंती केली आणि नंतर तिने त्यास होकार दिला. अनिक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही भेट दिली आणि अमृता फडणवीस यांनी उपस्थित असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली, असे तक्रारीत म्हटले आहे.
अनिक्शा जयसिंघानी हिने अमृता फडणवीस यांना क्रिकेट बुकींची माहिती सांगण्याची ऑफर देऊन त्यातून दोघीही खूप पैसे कमवू शकतो. असे म्हटले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी तिच्याशी बोलणे टाळले. त्यानंतर अनिक्शाने आपल्या वडिलांवरील म्हणजे अनिल जयसिंघानी यांच्यावरिल सर्व आरोप माफ करण्याच्या बदल्यात 1 कोटी रुपयांची लाच देऊ केली, असेही पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणानंतर अमृता फडणवीस यांनी तिला ब्लॉक केले, असेही तक्रारीत म्हटले आहे.