लेखिका गीतांजली श्री यांचा गौरव
वृत्तसंस्था / लंडन
कादंबरी ‘टॉम्ब ऑफ सँड’ला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. मूळ लेखिका गीतांजली श्री यांची हिंदीमध्ये ‘रेत समाधि’ या नावाने कादंबरी प्रकाशित झाली होती. या हिंदी कादंबरीचा अमेरिकन लेखिका डेजी रॉकवेल यांनी ‘टॉम्ब ऑफ सँड’ या नावाने इंग्रजीत अनुवाद केला होता. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराकरता 13 पुस्तकांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
‘टॉम्ब ऑफ सँड’ ही बुकर पुरस्कार मिळविणारी हिंदी भाषेतील पहिली कादंबरी आहे. तसेच कुठल्याही भारतीय भाषेत पुरस्कार मिळविणारी पहिली साहित्यकृती आहे. लंडनमध्ये गुरुवारी लेखिका गीतांजली श्री यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारादाखल त्यांना 50 हजार पाऊंड इतकी रक्कम मिळाली आहे. डेजी रॉकवेल यांच्यासोबत त्यांना ही रक्कम वाटून घ्यावी लागणार आहे.
उत्तरप्रदेशच्या मैनपुरी येथील गीतांजली श्री यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘बुकर पुरस्काराचे स्वप्न मी कधीच पाहिले नव्हते. अशी कामगिरी गाठू शकेन, असा विचारही मी केला नव्हता’, असे त्यांनी म्हटले आहे. गीतांजली श्री यांनी आतापर्यंत तीन कादंबऱया आणि एक कथासंग्रह लिहिला आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा इंग्रजी, जर्मन, सर्बियन, प्रेंच आणि कोरियन भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित किंवा इंग्रजीत अनुवादित करण्यात आलेल्या कुठल्याही एका साहित्यकृतीला बुकर पुरस्कार प्रदान केला जातो.









