जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या भेटीतून साकारले ग्रंथालय : वाचकांची होतेय सोय
बेळगाव : सरकारी कार्यालयामध्ये एखादा वरिष्ठ अधिकारी रुजू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून त्यांचे फुलांचे बुके देऊन स्वागत केले जाते. यासाठी नागरिकांकडून होणारा खर्च लक्षात घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कोणालाही बुके न आणण्याचे आवाहन केले आहे. तर आपल्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात तसा फलक ही लावला आहे. वायफळ खर्च होणारे पैसे पुस्तकांवर करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात पुस्तकांचे संग्रहालय साकारण्यात आले आहे. फुलांच्या बुकेवर नागरिकांकडून वायफळ खर्च केला जातो. हा खर्च टाळण्यासाठी नागरिकांना फुलांचा बुके न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पुस्तक आणण्यासाठी आवाहन करण्यात आले नव्हते, असे असले तरी अनेक नागरिकांनी आपल्या स्वइच्छेने वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. त्या माध्यमातूनच कार्यालयामध्ये पुस्तकांचे संग्रहालय साकारण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या कामानिमित्त जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक येत असतात. त्यांना तासन्तास बसावे लागते. अशावेळी विरंगुळा मिळावा, याबरोबरच ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात पुस्तकांचे संग्रहालय साकारण्यात आले आहे. महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासाठी काही निधी राखून ठेवला होता. सदर निधीतून आलेली पुस्तके ठेवण्यासाठी ग्रंथालय उभारण्यात आले आहे. या कामासाठी सदर निधी खर्च करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
केवळ कन्नड पुस्तकेच भेट…
जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या भागातून नागरिक येत असतात. त्यांच्याकडूनच दिलेली पुस्तके संग्रह करून ठेवण्यात आली आहेत. मराठी पुस्तके उपलब्ध नाहीत का? असे विचारले असता सदर पुस्तके भेट म्हणून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोणतेच पुस्तक ठेवण्यात आलेले नाही. कन्नड, मराठी असा कोणताच भेदभाव नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.









