वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) एप्रिलमध्ये होणाऱ्या बोर्ड बैठकीत नवीन बोनस गुण पद्धतीवर विचार करण्याची शक्यता आहे. ही पद्धती पुढील जागतिक कसोटी स्पर्धेदरम्यानच्या मोठ्या विजयांना, विशेषत: परदेशात मिळविलेल्या विजयांना अधिक महत्त्व आणू शकते. 2025 ते 27 जागतिक कसोटी स्पर्धेची सुऊवात जूनमध्ये इंग्लंडविऊद्धच्या भारताच्या पाच सामन्यांच्या परदेशातील कसोटी मालिकेने होईल. प्रचलित नियमांनुसार, सर्वांत कमी फरकाने मिळविलेल्या किंवा एका डावाने मिळविलेला विजय असो, जिंकणाऱ्या संघाला 12 गुण, ‘टाय’साठी सहा गुण आणि बरोबरीसाठी चार गुण मिळतात.
परंतु एका वृत्तानुसार, क्रिकेटचे जागतिक प्रशासकीय मंडळ डावाने मिळविलेल्या विजयासाठी किंवा 100 धावांसारख्या विशिष्ट मोठ्या फरकाने प्राप्त केलेल्या विजयासाठी बोनस पॉइंट देण्याचा विचार करत असून त्यामुळे यात बदल होऊ शकतो. ‘खरे तर डावाने मिळविलेल्या विजयासाठी बोनस गुण देणे इत्यादी मुद्यांवर जागतिक कसोटी स्पर्धेच्या सुऊवातीपासूनच सतत चर्चा होत आली आहे. कारण अनेक संघांना मोठ्या संघांविऊद्ध मिळविलेल्या विजयास योग्य वजन प्राप्त होत नाही असे वाटते, असे या घडामोडीशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले. ‘हे विषय चर्चेचा भाग राहिलेले आहेत आणि ते पुन्हा चर्चेत येऊ शकतात’, असे सदर सूत्राने पुढे सांगितले.
परंतु आता ही परिस्थिती बदलू शकते. कारण आयसीसी मोठ्या फरकाने मिळविलेल्या विजयासाठी बोनस गुण लागू करू शकते आणि भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या आघाडीच्या संघांविऊद्ध मिळविलेल्या विजयासाठी त्यांच्या क्रमवारीनुसार अतिरिक्त गुण दिले जाऊ शकतात. ‘जर खरोखर असे घडले, तर ते एक चांगले पाऊल ठरेल. संघ सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास अधिक प्रेरित होतील आणि आपल्याला काही रोमांचक सामने पाहायला मिळतील’, असे एका माजी भारतीय खेळाडूने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले. याशिवाय, आयसीसी बैठकीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तोंडी पाठिंबा दिलेल्या द्विस्तरीय कसोटी प्रणालीवर देखील विचार केला जाऊ शकतो.









