ब्रिटनमध्ये मानवी कवटी आणि हाडांची विक्री वेगाने वाढत आहे. हा धोकादायक ट्रेंड आता थडग्यांमधून हाडं चोरण्यासारख्या गुन्ह्यांना बळ पुरविण्याचा धोका निर्माण करत आहे. ब्रिटनमध्ये अवशेषांच्या खरेदीविक्रीला सध्या अवैध मानले जात नाही, यामुळे याचा बाजार बहरत आहे.
ब्रिटनमध्ये निच शॉप्स आणि ऑनलाइन रिटेलर्सकडून मानवी कवटी आणि हाडांची विक्री होत आहे. याचबरोबर विक्रीच्या यादीत ममीकृत अवयव, मानवी चामड्याने निर्मित मास्क आणि वॉलेट यासारख्या अजब सामग्री देखील सामील आहेत. या गोष्टींची मागणी त्यांना सुपरनॅचरल मानणाऱ्या लोकांमध्ये वाढत आहे.
हा ऑनलाइन बाजार मृतदेह चोरण्याच्या एका नव्या गुन्ह्याला चालना देत आहे. लोक आता थडग्यांमधून मृतदेह बाहेर काढत आहेत, असा दावा फॉरेन्सिक वैज्ञानिक डेम सू ब्लॅक यांनी केला. पक्ष्यांच्या घरट्यांची विक्री अवैध असू शकते, मग मानवी शरीराची विक्री का नाही? कुणाच्या दातांनी तयार केलेला हार परिधान करणे समाजात स्वीकारार्ह ठरू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये अशाप्रकारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियाने या पूर्ण बाजाराला नवी दिशा दिली आहे. परंतु कायदेशीर त्रुटी गुन्हेगारांना मोकाट फिरण्याची संधी देतात, असे पॅम्ब्रिज विद्यापीठाच्या तज्ञ ट्रिश बियर्स यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कुठल्याही थडग्याला अपवित्र करणे गुन्हा आहे, परंतु मानवी अवशेषांना कायदेशीर स्वरुपात संपत्ती मानले जात नाही. याचा अर्थ तांत्रिक दृष्ट्या त्यावर मालकी हक्क किंवा चोरी यासारख्या व्याख्या लागू होत नाहीत. अशा स्थितीत ऐतिहासिक मानवी अवशेषांना बेकायदेशीरपणे बाहेर काढले तरीही त्याची खरेदी विक्री गुन्हा ठरणार नाही.









