डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती : उत्तर कर्नाटकात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया
बेळगाव : केएलई डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतीच बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही अतिशय अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. विशेष म्हणजे एका 7 वर्षीय बालिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे. उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रात अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच केएलई कॅन्सर हॉस्पिटलने केल्याची माहिती केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केएलई कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळत असल्यामुळे उत्तर कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रातील कॅन्सर रुग्ण दाखल होत आहेत. लहान मुलांमधील कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत व चांगले उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो. 7 वर्षीय बालिकेला 70 दिवस केमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर सर्जरी करून सध्या रेडिएशन करण्यात येत आहे. बालरक्त रोगतज्ञ डॉ. अभिलाषा एस. यांच्या टीमने बालिकेवर यशस्वी उपचार केल्याचे केएलईचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी सांगितले.
सततचा ताप, डोकेदुखी, अपचन, शरीराची वाढ खुंटणे आदी लक्षणे लहान मुलांमध्ये जाणवू शकतात. वेळेत उपचार झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होऊ शकतो. सात वर्षीय बालिकेच्या उपचारासाठी 12 ते 13 लाख रुपये खर्च आला असता. परंतु केएलईने तिची कौटुंबिक परिस्थिती पाहून पूर्णत: मोफत उपचार केले आहे. त्याचबरोबर केएलई कॅन्सर हॉस्पिटलतर्फे तपासणी शिबिर राबवित असल्याची माहिती डॉ. अभिलाषा यांनी दिली.
कॅन्सर झाल्याचे समजताच धक्का बसला
रायबाग तालुक्यातील निलजी या लहानशा गावातील एका 7 वर्षीय बालिकेला कॅन्सर असल्याचे पेट स्कॅनमधून समजताच पायाखालील जमीन सरकली. गुटखा, तंबाखू यामुळे कॅन्सर होतो इतकीच माहिती होती. परंतु आपल्या लहानग्या मुलीला कॅन्सर होऊ शकतो याचा विचारच केला नव्हता. केएलई हॉस्पिटलने सहकार्य केल्यामुळे केमोथेरपी, सर्जरी व रेडिएशन असे उपचार करण्यात आले. यामुळे आमच्या मुलीला नवा जन्म मिळाल्याचे त्या बालिकेच्या कुटुंबीयांनी सांगितले.









