डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांची कामगिरी
प्रतिनिधी/ बेळगाव
शरीरात प्लेटलेट्स निर्माण होत नसल्याने मृत्यूशी झुंज देत असलेल्या चार वर्षाच्या बालिकेवर अस्थीमज्जा प्रत्यारोपण करून बालिकेला जीवदान मिळवून देण्यात आले. केएलईच्या डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
बालिकेच्या रक्तातील पांढऱ्या पेशींमध्ये सतत घट होत होती. बालिकेला सतत प्लेटलेट्स देणे आवश्यक होते. डॉ. शिवणगी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना याचे निदान झाल्यानंतर दुसऱ्याकडून अस्थीमज्जा दान मिळवून बालिकेवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
घटप्रभा, ता. गोकाक येथील चार वर्षाच्या मुलीला जन्मापासूनच आनुवंशिक आजारांनी ग्रासले होते. तिच्या अस्थीमज्जा पूर्णपणे निकामी होण्याच्या टप्प्यावर पोहोचल्या होत्या. त्यामुळे अस्थीमज्जा प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. अॅलोजेनिक हेमॅटोपोएटिक स्पर्मसेल प्रत्यारोपण करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या बालिकेच्या निरोगी बहिणीने तिच्या अस्थीमज्जा दान करून जीवदान मिळवून दिले आहे. शस्त्रक्रिया यशस्वीतेनंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्यात आता निरोगी रक्तपेशी तयार होत आहेत.
उत्तर कर्नाटकातील हे पहिले अॅलोजेनिक बोनमॅरो ट्रान्सप्लांट आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या उपचारामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बालरोग कर्करोगतज्ञ डॉ. अभिलाषा एस. व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी डॉ. अभिलाषा व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.









