सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने पोलीस विनायक कोळी यांचे रक्तदान
ओटवणे प्रतिनिधी
नांदोस येथील राजाराम गोविंद गावडे (वय ६६) यांना डायलिसिससाठी अतिदुर्मिळ अशा बाँबे ब्लड ग्रुपच्या रक्ताची गरज होती. याची माहिती सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक तथा जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांना मिळताच त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथील पोलीस विनायक कोळी यांनी सर्वात अतिदुर्मिळ अशा या रक्तगटाचे रक्तदान केले. सदर रुग्णासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी ६ वेळा बॉम्बे रक्तगटाचे रक्त उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या अति दुर्मिळ रक्तासाठी किशोर नाचणोलकर यांनी कोल्हापूर येथील पोलीस विनायक कोळी यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी शाहू रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यासाठी बॉम्बे ब्लड ग्रुपचे ऑर्गनायझेशन विक्रमदादा यादव तसेच शाहू रक्तपेढीचे श्री जमदाडे यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर किशोर नाचनोलकर यांनी स्वतः कोल्हापूर येथे जात ही ही रक्त बॅग राजाराम गावडे यांच्यासाठी उपलब्ध करून दिली. राजाराम गोविंद गावडे यांना दुर्मिळ अशा रक्तगटाचे दाते मिळवून दिल्याबद्दल गावडे कुटुंबियांनी सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.
बाँबे ब्लड ग्रुप हा जगाच्या लोकसंख्येत १० लाख लोकांत फक्त ४ जणांचाच असतो. त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ असाच आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रक्तपेढींच्या सहकार्याने तब्बल ४ रक्तदाते एका मालवण तालुक्यात सापडले आहेत. तर जिल्ह्यात एकूण १९ ची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या अतिदूर्मिळ रक्तगटाची संख्या वाढत असून, अतिदुर्मिळ गट सापडला आहे. जिल्ह्यात बॉम्बे ब्लड ग्रुपची संख्या वाढत असुन प्रसंगाची किंवा आजारपणाची वाट न पहाता सर्वांनी आपला रक्तगट तपासणे गरजेचा आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहिम हाती घेतली असुन सर्व ओ पॉझिटीव्ह गटाच्या व्यक्तीनी स्वताची बॉम्बे ब्लड ग्रुपसाठी तपासणी करुन घेवुन सहकार्य करावे असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर सचिव किशोर नाचणोलकर यांनी केले आहे.