केवळ तीन शासकीय अधिकारी हजर : तब्बल सात वर्षांनी ग्रामसभा झाल्यामुळे अनेक नागरी समस्या जैसे थे
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
ग्राम विकास अधिकाऱ्यांना अनेक शासकीय विकासकामांच्या प्रश्नांचे भडिमार करत फक्त तीन शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ची 2025-26 मधील पहिल्या टप्प्यातील ग्रामसभा चव्हाट गल्लीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरमध्ये बुधवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा होत्या. नोडल अधिकारी म्हणून कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्लेशी उपस्थित होते. कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. ची ग्रामसभा 2018 मध्ये झाली होती. आता तब्बल सात वर्षांनी ग्रामसभा झाल्यामुळे तसेच गावात अनेक नागरी समस्या आ वासून उभ्या असल्यामुळे कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रा. पं. कर्मचारी मलप्रभा कणबर्गी यांनी स्वागत केल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या पाच हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कणबर्गी यांनी विविध योजनांची माहिती सांगून ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील 13 वॉर्डामधील ठराव संमत केलेल्या विकासकामांचा आढावा वाचून दाखविला.
शेतकऱ्यांसाठी योजना
यावेळी कृषी खात्याचे मल्लेशी म्हणाले ‘शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सवलतीच्या दरात सायकल कोळपा, नांगर, पावर टिलर ट्रॅक्टर, स्प्रिंकलर पाईप, औषध फवारणी पंपासह इतर योजनांची माहिती सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी तलाठी दयानंद कुगजी म्हणाले, पीएम किसान योजना कर्ज मिळवून घेणे वारसा त्वरित करून घेणे, सातबारा उतारा उर्वरितांनी आधार लिंक करून घेणे जेणेकरून जमिनीचे बनावट व्यवहाराला चाप बसेल, असे सांगितले. यावेळी बालकल्याण खात्याच्या अधिकारी व आरोग्य खात्याच्या अधिकारी, दिव्यांग खात्याच्या अधिकारी यांनीही योजनांची माहिती सांगितली. यावेळी पाणीपट्टी 120 रुपये वरून एकदम 920 रुपये ठराव पास न करताच आकारणी करण्यास कुणी परवानगी दिली असा सवाल पीडीओंना करण्यात आला. यावेळी राजू मन्नोळकर यांनी कॉम्प्युटर उतारा घेण्यासाठी किती खर्च येतो असे पीडीओंना विचारताच गावठान व एनए साठी अगदी कमी खर्च येतो असे सांगितले.
कालवा खोदाई, काँक्रिटीकरण
संपूर्ण गावचे सांडपाणी तलावाजवळील कच्च्या कालव्यातून शेतवडीतून मार्कंडेय नदीला मिळते. पावसामुळे ग्रा. पं. ने कालव्यांची खोदाई न केल्यामुळे कालवा फुटून शेतवडीत पाणी घुसून अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले त्यामुळे सदर कालव्याची खोदाई व काँक्रिटीकरण करून नुकसान टाळण्याची मागणी कल्लाप्पा मैलण्णावर व श्रीधर कोळी यांनी केली तसेच कालव्याची खोदाई व काँक्रिटीकरण झाले नाही तर गावचे सांडपाणी गावाजवळील तलावामध्ये सोडू, असेही पीडीओंना सांगितले. यावेळी ही दोन्ही कामे त्वरित करून देण्याचे आश्वासन दिले. कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर रस्त्याचे डांबरीकरण केव्हा होणार, असा प्रश्न विचारल्यावर रस्त्याच्या 60 फुटासाठी सदर रस्त्याचे प्रकरण कोर्टात गेले आहे. तेव्हा कोर्टाच्या निकालापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होणार नाही, असेही पीडीओंनी सांगितले.
बसवनगरमध्ये रस्ता,विजेची सोय लवकरच
गौंडवाड येथील बसवनगरमध्ये 15 ते 20 वर्षे झाली परंतु घरे बांधलेल्या नागरिकांना अजून पक्का रस्ता नाही तसेच विद्युत खांब नसल्यामुळे गैरसोय होत आहे. तेव्हा रस्ता व विद्युत लाईटची व्यवस्था करण्याची मागणी रहिवाशांनी केली. पाहणी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सभेला ग्रा. पं. उपाध्यक्षा दीपा पम्मारसह सर्व ग्रा. पं. सदस्य व सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. पीडीओ गोविंद रंग्यापगोळ यांनी विविध योजनांची माहिती सांगून आभार मानले.
28 पैकी केवळ तीन अधिकारी हजर
शासनाच्या विविध 28 खात्यांच्या सवलतीची माहिती नागरिकांना मिळावी म्हणून 28 शासकीय अधिकाऱ्यांना ग्रा. पं. ने नोटीस दिली होती. परंतु केवळ तीन अधिकारी उपस्थित होते. उर्वरीत 25 अधिकाऱ्यांवर सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटीस पाठवून कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली.
दारू दुकान मालकांना नोटीस देऊ
किगदी तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम अजून पूर्ण झाले नाही, त्याच्या देखभालीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाला कोण वाली आहे की नाही, असा प्रश्न गजानन हर्जे यांनी केला. तसेच शाहूनगर, कंग्राळी बुद्रुक मुख्य रस्त्यावर ग्रा. पं. च्या परवानगीने सुरू असलेल्या दारू दुकानामुळे शेतकऱ्यांच्या शेतात दारूच्या रिकाम्या बाटल्या, काचा व प्लॅस्टिक कचऱ्याचा ढीग पडत आहे. त्यामुळे हे थांबवणार कोण, असा प्रश्न पीडीओंना विचारताच त्यांना नोटीस काढून त्यांच्या दुकानातच मद्यसेवनाची व्यवस्था करण्याची ताकीद देऊ, असे सांगितले.









