पोलीस खाते, समाज कल्याण खात्याविरोधात नागरिकांनी मांडल्या तक्रारी
बेळगाव : येथील जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मागासवर्गीय अन्याय निवारण बैठकीमध्ये जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडून तक्रारींचा भडिमार केला. पोलीस खाते, समाज कल्याण खाते, ग्राम पंचायत, धार्मिकस्थळी झालेल्या अन्यायाचा पाढा नागरिकांनी वाचला. यामुळे सदर बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेईपर्यंत चांगलीच फजिती झाली. जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दलित संघटनांच्या नेत्यांना व नागरिकांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांनंतर सदर बैठक होत असल्याने जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक हजर झाले होते. यावेळी बहुतांश नागरिकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार बैठकीत मांडली. झालेल्या अन्यायाविरोधात पोलीस खात्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांकडून तक्रारी दाखल करून घेण्यास चालढकलपणा केला आहे, तर अनेक ठिकाणी सहकार्य न केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
अथणी तालुक्यामध्ये अद्यापही अस्पृश्यता पाळली जाते. देश स्वतंत्र होऊनही 75 वर्षांचा कालावधी लोटला तरी नागरिकांकडून माणूस म्हणून वागणूक देत नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. कागवाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलेकडून धार्मिक कार्यामध्ये कशाप्रकारे अडवणूक केली जाते, याचा पाढा बैठकीत वाचला. शेडबाळ येथील रथोत्सवादरम्यान पूजा करण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या महिलेने केला. याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली असली तरी कोणताच उपयोग झाला नाही. तक्रार दाखल करून घेतानाही पोलीस खात्याकडून अपेक्षेनुसार सहकार्य मिळाले नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी समस्या ऐकून घेऊन चौकशी करून तोडगा काढू, असे सांगितले. अस्पृश्यता निवारणासाठी बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू, असे जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. यावेळी समाज कल्याण खात्याची वसतीगृहे, शासकीय योजना, बगरहुकूम शेती, स्मशानभूमीची समस्या, विकासकामांच्या निधीतील गैरप्रकार आदींबाबत तक्रारी मांडण्यात आल्या. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस अधिकारी रविंद्र गडादी आदी उपस्थित होते.
तक्रार करण्यास चढाओढ…
बऱ्याच दिवसांनंतर अन्याय निवारण बैठक बोलाविण्यात आल्याने जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांकडून तक्रार दाखल करण्यास चढाओढ सुरू होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार नागरिकांची समजूत काढून शांत राहण्याचे आवाहन केले.
तालुका पातळीवर घेणार जनसंपर्क बैठक : जिल्हाधिकारी नितेश पाटील
मागासवर्गीय अन्याय निवारण बैठकीला जिल्ह्यातून बहुतांश तालुक्यातील नागरिक हजर होते. मात्र सरकारी योजनांच्या व झालेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी नागरिकांची चढाओढ लागली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क बैठक घेऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, असे आश्वासन दिले. जिल्हा पंचायत कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या अन्याय निवारण बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्ह्यातील निपाणी, कागवाड, अथणी, रायबाग, हुक्केरी, बेळगाव, खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आदी तालुक्यातील नागरिकांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. त्यामुळे जिल्हा पंचायत कार्यालयातील सभागृह तुडुंब भरले होते. नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अपुरी पडली होती. त्यामुळे तक्रार नोंदविण्यास आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. बैठकीत उपस्थित नागरिकांना तक्रार नोंदविताना चढाओढ करावी लागल्याने तक्रार नोंदविणे अशक्य झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांकडून ढिसाळ नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. याठिकाणी आपल्या समस्या मांडणे अशक्य आहे. त्यामुळे तालुका पातळीवर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी बैठकीत केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी समस्या निवारण करण्यासाठी तालुका पातळीवर जनसंपर्क बैठक घेऊन प्रत्येक तालुक्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील, असे सांगितले. जनसंपर्क बैठकीमध्ये तालुका तहसीलदार, तालुका पातळीवरील कृषी अधिकारी, बागायत अधिकारी, समाज कल्याण खात्याचे अधिकारी, डीवायएसपी, जिल्हा पोलीसप्रमुख यांना घेऊन बैठक घेतल्या जातील. घेण्यात येणाऱ्या बैठकीची माहिती नागरिकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.









