पोलीस बघ्याच्या भूमिकेत : भाजपचा आरोप
वृत्तसंस्था/भाटपाडा
पश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्षांशी संबंधित लोकांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी रात्री 24 परगणा येथे भाजप नेते अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले. गुंडांनी त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात देशी बॉम्ब फेकले आणि गोळीबारही केला. भाजप नेत्याने याकरता तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला जबाबदार ठरविले आहे. याचबरोबर या घटनेदरम्यान पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते असा आरोप आहे. भाटपाडा येथे अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात गुंडांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात एक युवक जखमी झाला आहे.अर्जुन सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला होता. परंतु हल्लेखोर तेथून पलायन करण्यास यशस्वी ठरले. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुनीता सिंह यांचा पुत्र नमित सिंहचा हात आहे. नमितने पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप भाजप नेत्याने केला. मागील वर्षी नमित, सद्दाम आणि त्याच्या गुंडांनी माझ्या निवासस्थानाला लक्ष्य केले होते. बुधवारचा हल्ला हा पोलिसांसमोरच झाला असल्याचा दावा अर्जुन सिंह यांनी केला आहे.









