वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीनंतर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळूरमधील 50 शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर बेंगळूरमधील प्रशासन सतर्क झाले आहे. आरआर नगर आणि केंगेरीसह बेंगळूर शहरातील 50 खासगी शाळांना शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर शहरातील सर्व शाळांमध्ये शोध आणि तपास सुरू करण्यात आला. मात्र, तपासात काहीही सापडले नाही. यापूर्वी राजधानी दिल्लीत, एक-दोन नव्हे तर 20 शाळांना पहाटे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.
शहरातील शाळांना शुक्रवारी सकाळी 7.24 वाजता ईमेल मिळाला होता. या संदेशात शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये अनेक स्फोटके ठेवली असल्याचे नमूद करण्यात आले होते. ई-मेल संदेश मिळताच शाळा प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस दल अधिकाऱ्यांनी बॉम्ब पथके आणि इतर तपास पथकांसह शाळांमध्ये पोहोचत विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब परिसरातून बाहेर काढत तपास सुरू केला. तथापि, तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.









