वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील डीएलएफ मॉल, गुऊग्रामचा अॅम्बियन्स मॉल आणि मुंबईच्या इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. शनिवारी दुपारी एकाचवेळी अनेक मॉलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ निर्माण झाली. धमकी दिल्यानंतर तिन्ही मॉल रिकामे करून चौकशी करण्यात आली, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. डीएलएफ प्रोमेनेडमध्येही तपासणीवेळी मॉल रिकामा करण्यात आला. मात्र सुदैवाने कुठेही बॉम्ब नव्हता आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही. नोएडा येथील डीएलएफ मॉल ऑफ इंडियामध्ये बॉम्ब असल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मॉल रिकामा करण्यात आला. संपूर्ण मॉलची झडती घेतल्यानंतर हा मॉल जनतेसाठी खुला करण्यात आला.









