तपासणीत संशयास्पद वस्तू न सापडल्याने दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील काही शाळांना पुन्हा एकदा मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. नजफगड आणि मालवीय नगरमधील एकूण 50 शाळांना बुधवारी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. धमकी मिळाल्यानंतर लगेचच दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. पोलीस, बॉम्बशोधक पथक, बॉम्बनिकामी पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये धाव घेत तपासणी केली. मात्र, कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत.
शाळांना मेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. गेल्या काही महिन्यांत दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्यांची मालिका लक्षणीयरीत्या वाढली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातही दिल्लीतील शाळांमध्ये स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी 18 ऑगस्ट रोजी डीपीएस द्वारकासह तीन शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या होत्या. ही धमकी देखील मेलद्वारे देण्यात आली होती. त्याआधी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील द्वारका येथील सेंट थॉमस स्कूल आणि दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजलाही बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तसेच मागील वर्षी मे 2024 मध्येही डीपीएस द्वारकासह अनेक शाळांना असेच धमकीचे ईमेल आले होते.









